डिझेलचा खर्च वाढता, एलएनजी इंधनावर एसटी धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 09:45 PM2020-06-26T21:45:52+5:302020-06-26T22:18:53+5:30

पहिल्या टप्प्यात डिझेल इंधनावरील १ हजार २०० बस एलएनजी इंधनावर रूपांतरित होणार आहेत. 

As the cost of diesel increases, ST will run on LNG fuel | डिझेलचा खर्च वाढता, एलएनजी इंधनावर एसटी धावणार

डिझेलचा खर्च वाढता, एलएनजी इंधनावर एसटी धावणार

googlenewsNext
ठळक मुद्देएसटीची मालवाहतूक महिन्याभरापूर्वी एसटीने सुरु केलेल्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला असून एका महिन्यात एसटीने १ हजार ९०७ फेऱ्याद्वारे सुमारे ७२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

मुंबई : कोरोना काळात एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. एसटीची आर्थिक स्थिती भक्कम होण्यासाठी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली जात आहे. सर्वाधिक खर्च डिझेलवर होत आहे. त्यामुळे एसटी एलएनजी इंधनामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात डिझेल इंधनावरील १ हजार २०० बस एलएनजी इंधनावर रूपांतरित होणार आहेत. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीला होणारे आर्थिक नुकसान व भविष्यात करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीला कोल्हापूरहून व्हिडिओ कॉलद्वारे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

एसटी महामंडळाला होणाऱ्या आर्थिक नुकसान सावरण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, याची सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. त्यानुषंगाने भविष्यात खर्चामध्ये बचत करणे व प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात आला. एलएनजी इंधावरील बसेसना प्राधान्य सध्या एसटी महामंडळामध्ये १८५०० बस आहेत. यासर्व बस डिझेलवर धावतात. 

एसटीच्या एकूण महसुलाच्या ३४ टक्के रक्कम इंधन खरेदीवर खर्च होत आहे. भविष्यात या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने सध्या तांत्रिक दृष्ट्या सुस्थितीत असलेल्या बस डिझेल इंधनावरून एलएनजी  इंधनावर रूपांतरित करण्यात येणार आहेत.  पहिल्या टप्प्यात १ हजार २०० बस एलएनजी  इंधनावर रूपांतरित करण्यात येतील, असे अनिल परब बैठकीत म्हणाले. 

एसटीची मालवाहतूक महिन्याभरापूर्वी एसटीने सुरु केलेल्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला असून एका महिन्यात एसटीने १ हजार ९०७ फेऱ्याद्वारे सुमारे ७२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. डिसेंबर २०२१ अखेर सुमारे २००० मालवाहू वाहने तयार करून त्याद्वारे सुमारे २५० कोटी रुपये महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शासनाच्या विविध विभागांना संपर्क साधून शासकीय मालवाहतूक एसटी कडे वळविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. 

खासगी बस बांधणीला सुरुवात करणार  एसटीकडे सध्या ३ मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. या कार्यशाळेमध्ये एसटी बसेसची पुनर्बांधणी करण्यात येते. भविष्यात व्यावसायिक स्तरावर खासगी बस बांधून त्याद्वारे महसूल मिळवण्याची योजना एसटी महामंडळाने तयार केली  असून खासगी वाहन धारकांना बस बांधणीसाठी एसटी कडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केला जाणार  आहेत.  व्यासायिक तत्वावर टायर पुनर्रस्थिरीकरण प्रकल्प सुरु करणार  सध्या एसटी महामंडळाचे राज्यभरात ९ टायर पुनर्रस्थिरीकरण प्रकल्प कार्यंवित आहेत. प्रकल्पाद्वारे एसटी साठी लागणाऱ्या टायरचे पुनर्रस्थिरीकरण  करण्यात येते. भविष्यात  या प्रकल्पाची  क्षमता लक्षात घेता एसटीची गरज  भागवून व्यावसायिक तत्वावर टायर पुनर्रस्थिरीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. 

एसटी महामंडळाच्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याच्या दृष्टीने व्यवहारिक योजना तयार करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले आहेत. भविष्यात वाहतुकीत व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करून फायद्याच्या मार्गावरील बस फेऱ्यांची संख्या वाढवून अनुउत्पादित किलोमीटर वाहतुकीतून कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे अनिल परब यांनी सांगितले.   
 

Web Title: As the cost of diesel increases, ST will run on LNG fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.