यवतमाळ मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाचा हिशेबच जुळेना; दीड वर्ष लोटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:52 AM2020-06-16T03:52:34+5:302020-06-16T03:53:06+5:30
अद्याप ऑडिट नाही; म्हणे, महामंडळाकडे हिशेब मागा
यवतमाळ : दीड वर्षांपूर्वी यवतमाळात पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अद्यापही हिशेब जुळलेला नाही. या खर्चाचे लेखा परीक्षणही झालेले नाही. उलट हा हिशेब विदर्भ साहित्य संघ अथवा मराठी साहित्य महामंडळाला मागण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
११, १२ व १३ जानेवारी २०१९ ला यवतमाळात ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाचे अध्यक्षपद, संमेलनासाठी होणारी वसुली या मुद्यावरून सुरुवातीपासूनच हे संमेलन वादग्रस्त ठरले. ‘लोकमत’ने संमेलनासाठी सुरू असलेल्या वसुलीचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर अमरावतीच्या विभागीय माहिती अधिकाऱ्यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या वसुलीसाठी नियमानुसार परवानगी आवश्यक असताना ती घेतली गेली नाही, असा मुद्दा तक्रारीत उपस्थित केला होता.
जनतेचा पैसा कोरोनासाठी खर्च करा
आयोजकांच्या या खात्यात ४० लाख रुपये शिल्लक होते. त्यापैकी २५ लाखांचा खर्च दाखविला गेला. सध्या १५ लाख रुपये शिल्लक आहेत. मात्र त्या २५ लाखाच्या देयक व अधिकृत कागदपत्रांची जुळवाजुळव होत नसल्याचेही बोलले जाते. आता बँक खात्यातील १५ लाख शिल्लक कोविड-१९ साठी जिल्ह्यात खर्च केला जावा, अशी मागणी आहे.