कापूस उत्पादकांचे पाच हजार कोटी बोंडअळीने खाल्ले
By अतुल कुलकर्णी | Published: December 8, 2017 03:48 AM2017-12-08T03:48:41+5:302017-12-08T03:48:46+5:30
गुलाबी बोंडअळीने कापसाचे पीक फस्त केल्याने बीटी कॉटन बियाणे आणि कीटकनाशकांवर कापूस उत्पादक शेतकºयांनी खर्च केलेले सुमारे पाच हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.
मुंबई : गुलाबी बोंडअळीने कापसाचे पीक फस्त केल्याने बीटी कॉटन बियाणे आणि कीटकनाशकांवर कापूस उत्पादक शेतकºयांनी खर्च केलेले सुमारे पाच हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.
यंदा ४२.०६ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. पैकी ९५ टक्के क्षेत्र बीटी कापसाच्या पिकाखाली आहे. यासाठी १ कोटी ६५ लाख बीटी कापसाच्या बियाणांची पाकिटे वापरली गेली. एका पाकिटाची किंमत ७५० रुपये लक्षात घेता फक्त बियाणांवर शेतकºयांचे १२३७ कोटी ३० लाख रुपये खर्च झाले. तर सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये रासायनिक औषधे व खतांवर खर्च केले गेले आहेत.
सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ कॉटन रिसर्च या केंद्रीय संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. के.आर. क्रांथी यांच्या समितीने डिसेंबर २०१५ मध्येच विविध राज्यांतल्या कापसाच्या पिकाचा अभ्यास करून बीटी कॉटनचे बियाणे बोंडअळीला बळी पडू नये यासाठी काही उपाय सुचवले होते. मात्र त्यावर केंद्र सरकारने ठोस पावले उचलली नाहीत.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ६ जुलै रोजी राज्य सरकारला पत्र लिहून वेळीच उपाय करा, असे कळवले. मात्र सरकारने दखल घेतली नाही. परिणामी ९५ टक्के कापसाचे पीक बोंडअळीच्या तडाख्यात सापडले.
बोंडअळी दाद देत नाही हे पाहून शेतकºयांनी दोन-तीन रासायनिक औषधांचे मिश्रण करून फवारणी केली. त्यात काही शेतकºयांचे जीवही गेले. मात्र हजारो कोटींचा व्यवहार करणाºया कंपन्यांचे मिंधे झालेल्या अधिकाºयांनी आणि प्रशासनाने कोणतीही प्रभावी जनजागृती केली नाही, असा गंभीर आरोप मुंडे यांनी केला आहे.
केंद्र शासनाने बीटी तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करण्यासाठी बियाणे उत्पादकांना बी.जी. २ तंत्रज्ञानावर आधारित बियाणे उत्पादनाची परवानगी दिली असून यात ‘ट्रान्सजेनिक जिन्स’ असल्याने बोंडअळीला प्रतिकार करणारे आहे, असा खुलासा कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी केला आहे. मात्र या बियाणांची प्रतिकारशक्ती कशी कमी झाली, हे त्यांनी सांगितले नाही.
तुम्ही सरसकट पद्धतीने २० रोपे निवडा, त्यात अळी दिसली तर फवारणी करा, असे अत्यंत बारीक अक्षरात बी.टी. बियाणे कंपन्यांनी माहिती पत्रकात छापलेले असते. मात्र हे कोणी शेतकºयांना सांगत नाही. ही सगळी कंपन्यांची आणि अधिकाºयांची बदमाशी आहे. तंत्रज्ञानात शेतकºयांचा अभिमन्यू करून त्याला आणखी गाळात घातले जात आहे. - विजय जावंधिया, शेतीतज्ज्ञ