कापूस, धान उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 03:28 AM2020-12-14T03:28:10+5:302020-12-14T03:28:19+5:30

चुकारे उशिरा मिळत असल्याने ग्रामीण भागातील खेडा खरेदीत भाव कमी मिळत असला तरी रोख रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल व्यापाऱ्यांकडे जास्त आहे. 

Cotton, grain growers robbed by traders | कापूस, धान उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट

कापूस, धान उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट

googlenewsNext

विदर्भातील दोन नगदी पिके कापूस आणि धानाची खरेदी सुरू झाली आहे. शासकीय यंत्रणेकडून या शेतमालाची खरेदी संथ गतीने सुरू असल्यामुळे या स्थितीचा व्यापारी फायदा उचलत असल्याचे चित्र विदर्भात सर्वत्र दिसत आहे. यंदा कापसाचा पेरा कमी होता. त्यातही सततचा पाऊस आणि बोंडसड व गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले. चुकारे उशिरा मिळत असल्याने ग्रामीण भागातील खेडा खरेदीत भाव कमी मिळत असला तरी रोख रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल व्यापाऱ्यांकडे जास्त आहे. 

यंदा धान खरेदीसाठी ऑनलाइन सातबाराची अट आहे. शिवाय वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे हे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. धान खरेदीची मर्यादा एकरी १२ क्विंटलवरून ९.६ क्विंटल केल्याने शेतकऱ्यांना उर्वरित धान कवडीमाेल भावात खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागणार आहे. गाेदामांचा अभाव आणि बारदानाचा तुटवडादेखील खरेदीत अडसर ठरत आहे.

कापसाची चार, धानाची सहा खरेदी केंद्रे
- सुनील चरपे
नागपूर : जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी सीसीआय आणि पणन महासंघाने प्रत्येकी दाेन खरेदी केंद्र सुरू केली असून, सीसीआयच्या एक तर पणनच्या दाेन केंद्रांवर सध्या कापूस खरेदी सुरू आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात चार, कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुका खरेदी-विक्री संघाचे प्रत्येकी एक अशी एकूण सहा धान खरेदी केंद्रे सुरू आहेत.

६५ हजार क्विंटल कापसाची खरेदी
- गजानन मोहोड
अमरावती : जिल्ह्यात नोव्हेंबरच्या अखेरपासून १२ केंद्रांवर कापसाची नोंदणी व सात केंद्रांवर खरेदी सुरू झाली. १५,१८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.  ५,४९१ शेतकऱ्यांचा ६५,३५४ क्विंटल कापूस शुक्रवारपर्यंत खरेदी करण्यात आला. शेतकरी केंद्रावर विक्रीसाठी कापूस कमी प्रमाणात आणत आहेत. त्यांच्याशी पुन्हा संवाद साधला असता, प्रतिसाद मिळत नसल्याचे पणन महासंघाच्या सूत्रांनी सांगितले. 

वाशिम जिल्ह्यात तीनच केंद्रे 
- दादाराव गायकवाड
वाशिम : २५ दिवसांत जिल्ह्यातील तीन केंद्रांवर केवळ १५०० शेतकऱ्यांकडील ३५०२ क्विंटल कपाशीची खरेदी  झाली. खासगी बाजारात कवडीमोल दराने खरेदी केली जात होती. अखेर १० नोव्हेंबर रोजी अनसिंग आणि मंगरूळपीर येथे सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली, तर कारंजात सीसीआयचे उपअभिकर्ता म्हणून फेडरेशनने २३ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी सुरू केली. 

सीसीआय केंद्र बंद, शेतकऱ्यांना भुर्दंड!
-  प्रवीण खेते
अकोला : वातावरणातील बदलाचे कारण सांगून जिल्ह्यातील सीसीआय केंद्र बंद असून कापसाचे ग्रेडिंग आणि माप बंद आहे. त्यामुळे कापूस खरेदी प्रभावीत झाली असून, शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. अकोट तालुक्यातील ग्रेडर कोविड पॉझिटिव्ह आल्याने येथील सीसीआय केंद्र बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला कापूस येथेच पडून आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी कापूस खरेदी प्रक्रिया ठप्प पडली आहे. 

शेतकऱ्यांचा कल व्यापाऱ्यांकडे
- रवि जवळे
चंद्रपूर : यावर्षी बाजार समितीमध्ये योग्य दर दिला जात  आहे. त्यामुळे सधन शेतकऱ्यांचा कल बाजार समितीकडे आहे. गरजू शेतकरी मात्र नुकसान सोसून व्यापाऱ्यांना धान देत नगदी चुकारा घेत आहेत. नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, मूल येथे धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. कापूस उत्पादकांची स्थितीही बिकट आहे. प्रतवारी योग्य नसल्याने कापूस वापस केला जात आहे. त्यामुळे नाइलाजाने खासगी व्यापाऱ्यांना ५ हजार शंभर रुपये दराने कापूस विक्री करावा लागत आहे.

१३ पैकी सात तालुक्यातच खरेदी
- सदानंद शिरसाट
खामगाव (जि. बुलडाणा) : सीसीआयची खामगाव, मलकापूर, नांदुरा, चिखली या ठिकाणी तर पणन महासंघाने जळगाव जामोद, देऊळगाव राजा, शेगाव या ठिकाणी केंद्र  आहेत. जळगाव जामोद, शेगाव येथे केंद्र सुरू झाली आहेत. व्यापाऱ्यांकडून प्रती क्विंटल ५ हजार रुपये भाव दिला जात आहे. हमीदरापेक्षा ८०० रुपये कमी दराने कपाशी विकावी लागली. १३ पैकी सात तालुक्यांच्या ठिकाणीच कापूस खरेदी होणार आहे. 

एक लाख क्विंटल खरेदी
- रुपेश उत्तरवार
यवतमाळ :  जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब आणि आर्णी या तीन केंद्रांवर पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू आहे. येथे आतापर्यंत एक लाख सहा हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. सीसीआयने घाटंजी, राळेगाव, दारव्हा आणि वणीमधील केंद्रांवर एक लाख ३८ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. अपुरे केंद्र असल्याने खासगी व्यापाऱ्यांनी कमी भावात दोन लाख २७ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. 

साडेपाच लाख क्विंटल खरेदी
- आनंद इंगोले
वर्धा : जिल्ह्यात सीसीआयच्या सहा केंद्रांच्या माध्यमातून २८ जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरु आहे. पणन महासंघाची दोन केंद्रे सुरू असून दोन दिवसात आणखी एक केंद्र सुरू होणार आहे. आतापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र आणि खासगी व्यापाऱ्यांनी तब्बल ३० हजार शेतकऱ्यांकडून ५ लाख ५७ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. दोन आठवड्यांपासून बाजार गडगडल्याने शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावरील गर्दी ओसरली आहे.

वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांची कोंडी
 - अंकुश गुंडावार 
गोंदिया : वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास नकार दिला जात आहे. जिल्ह्यात वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांची संख्या ११५० वर आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. आदिवासी विकास महामंडळाची ४४ पैकी २५ धान केंद्रे सुरू झाली आहेत. आतापर्यंत ७० कोटी रुपयांची धान खरेदी झाली आहे. मात्र, चुकारे मिळाले नाहीत.

गाेदामांचा अभाव, बारदान्याचा तुटवडा
- ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा : मंजूर ७९ केंद्रांपैकी ७३ केंद्रांवर धान खरेदी सुरू असली तरी गाेदामांचा अभाव आणि बारदानाचा तुटवडा खरेदीत अडसर ठरत आहे. खुल्या बाजारापेक्षा फेडरेशनचे दर अधिक असल्याने शेतकरी येथे माेठ्या प्रमाणात धान विक्रीस आणतात. आतापर्यंत सुमारे अडीच लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. मात्र अद्याप एकाही शेतकऱ्याला चुकारा मिळाला नाही. 

ऑनलाइनमुळे पट्टेधारक शेतकरी अडचणीत
- दिलीप दहेलकर
गडचिराेली : आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनशी संलग्नित खरेदी-विक्री सहकारी संघातर्फे जिल्ह्यात धान खरेदी सुरू आहे. मात्र ऑनलाइन प्रक्रियेमुळे पट्टेधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. पट्टेधारक शेतजमिनीच्या ऑनलाइन सातबारात शेतकऱ्यांच्या नावाऐवजी मालक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नावाचा उल्लेख आहे. त्यात सरकारी जंगल, असा उल्लेख केला असल्याने शेतकऱ्यांची धानविक्रीसाठी अडचण हाेत आहे. त्यांना धानविक्रीसाठी टाेकन मिळत नसल्याची माहिती आहे. 

कापूस शासकीय खरेदी यंत्रणा
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय)  पणन महासंघ

आधारभूत किंमत 
लांब धाग्याचा कापूस ५,८२५ रुपये प्रति क्विंटल
मध्यम धाग्याचा कापूस ५,५१५ रुपये प्रति क्विंटल
खुल्या बाजारातील भाव  : ५,१०० रुपये ते ५,५४० रुपये प्रति क्विंटल

धान शासकीय खरेदी यंत्रणा
आदिवासी विकास महामंडळ   महाराष्ट्र स्टेट काे-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन
आधारभूत किंमत शासनाचा बाेनस : ७०० रुपये 
एकूण भाव : २५८८ रुपये व २५६८ रुपये प्रति क्विंटल)
ए ग्रेड : १,८८८ रुपये प्रति क्विंटल
इतर ग्रेड : १,८६८ रुपये प्रति क्विंटल
खुल्या बाजारातील भाव  :  २,५७० रुपये ते ३,४९० रुपये प्रति क्विंटल

Web Title: Cotton, grain growers robbed by traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.