‘नोटबंदी’मुळे कापसाची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 06:33 AM2016-11-16T06:33:04+5:302016-11-16T06:33:04+5:30
नोटाबंदीचा विपरीत परिणाम कापसाच्या बाजारपेठेवर झाला आहे. पैसे मिळत नसल्याने कापूस विकण्यास शेतकरी राजी होत नसल्याने
यवतमाळ : नोटाबंदीचा विपरीत परिणाम कापसाच्या बाजारपेठेवर झाला आहे. पैसे मिळत नसल्याने कापूस विकण्यास शेतकरी राजी होत नसल्याने देशभरातील आवक सुमारे ७५ टक्क्यांनी घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
देशात दिवाळीनंतर दरदिवशी सुमारे दीड लाख गाठींची आवक होते, ती सध्या अवघ्या ३५ ते ४० हजार गाठींवर आली आहे. दिवाळीनंतर देशातील कापड मिल सुरू होतात. अपेक्षेनुसार त्यांच्याकडून रुईगाठींची मागणी वाढते. मात्र, कापसाची आवक नसल्याने ती पूर्ण करणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात आले.
देशातील कापड मिलला आठ दिवस, २१ दिवस व ३० दिवसांच्या साइडवर रुईगाठींचा माल दिला जातो. परंतु, सध्या ४५ दिवस साइड देऊनही पेमेंट येत नसल्याने व्यापाऱ्यांची कोंडी झाली आहे. गतवर्षी देशात ३०० लाख गाठींचे उत्पादन झाले होते. या वर्षी पीक परिस्थिती उत्तम असल्याने उत्पादन ३६० ते ३८० लाख गाठींपर्यंत जाईल, असा कृषी खात्याचा अंदाज
आहे.
कापसाचा सध्याचा दर सरासरी ४८०० रुपये प्रति क्ंिवटल आहे. नोटाबंदीनंतर २०० ते ३०० रुपये दर वाढले आहेत. परंतु, शेतकऱ्याला धनादेश मिळत आहेत. त्यातच प्रति आठवडा २४ हजार रुपयेच बँकेतून काढण्याची मर्यादा आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी विक्रीबाबत सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)