Coronavirus : ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 07:33 AM2021-12-30T07:33:30+5:302021-12-30T07:34:00+5:30
Aditya Thackeray : कोविड प्रतिबंधक नियम मोडणाऱ्या आस्थापनाही सील करण्यात येतील, असा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
मुंबई : मागच्या आठवड्यापासून ओमायक्रॉन व कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे. मात्र या बाधितांपैकी प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तरी ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. तसेच कोविड प्रतिबंधक नियम मोडणाऱ्या आस्थापनाही सील करण्यात येतील, असा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याने पालिकेकडून सुरू असलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा आदित्य यांनी बुधवारी घेतला. वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. पण घाबरण्याची गरज नाही. विनाकारण घराबाहेर पडू नका. ओमायक्रॉन गंभीर नसल्याचा सगळीकडे समज आहे. तशी निरीक्षणेदेखील दिसत आहेत. पण ते तसेच राहील का, यावर सविस्तर संशोधन झाले नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
नियम मोडणारी कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट सील करणार...
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यांवर बंदी आणण्यात आली आहे. तर, आस्थापनांनी नियम न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
बंदिस्त ठिकाणच्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासण्यात येणार असून नियमबाह्यता आढळल्यास ते ठिकाण सील करण्यात येईल, अशी ताकीद मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
हॉटेल आणि रेस्टाॅरंटमध्ये नियमांचे पालन होत आहे का, याची पाहणी करण्यासाठी विशेष पथकही तैनात असेल, असेही त्यांनी सांगितले. कोविड रुग्णांसाठी ५४ हजार खाटा तयार आहेत.
३१ डिसेंबरला इमारतींच्या गच्चीवर, संकुलातील मोकळ्या जागेतही पार्ट्या होतात. यावर बंदी नाही. मात्र, त्यांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
शाळा, कॉलेजचा निर्णय पुढच्या आठवड्यात...
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ३ तारखेपासून लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच बूस्टर डोसचे नियोजनदेखील सुरू आहे. शाळा- महाविद्यालय सुरू ठेवण्याबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.