सीईटी परिक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ : उदय सामंत
By हेमंत बावकर | Published: October 24, 2020 07:45 PM2020-10-24T19:45:54+5:302020-10-24T19:49:38+5:30
CET Exam Update : परिक्षा घेणे ही विद्यापीठांची जबाबदारी असली तरीही आम्ही शासन आणि विद्यापीठ वेगवेगळे असे मानत नाही. काही समस्या आल्यास आम्ही राज्यपालांकरवी युजीसीकडे जाऊ, असे उदय सामंत म्हणाले.
पूरस्थितीमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना सीईटीची परिक्षा देता आली नाही त्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
पूरग्रस्त विद्यार्थी जे परिक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सीईटी रजिस्ट्रेशनची लिंक देण्यात आली होती. ही लिंक आणखी दोन दिवस सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय परिक्षा घेणे ही विद्यापीठांची जबाबदारी असली तरीही आम्ही शासन आणि विद्यापीठ वेगवेगळे असे मानत नाही. काही समस्या आल्यास आम्ही राज्यपालांकरवी युजीसीकडे जाऊ, असे ते म्हणाले. तसेच ही परिक्षा 10 नोव्हेंबरआधी घेण्यात येईल असेही ते म्हणाले.
कधी कोरोना, कधी अतिवृष्टी तर कधी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ठप्प झालेल्या लोकल सेवा अशा अनेक कारणांमुळे यंदा सीईटीचे विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने या विद्यार्थ्यांना दिलासा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना (नोंदणी केलेल्या) काही अपरिहार्य कारणांमुळे एमएचटी सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी आणखी एक संधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अतिरिक्त सत्रासाठी अर्ज करायचा आहे.
विद्यार्थ्यांना नोंदणी करतानाच अतिरिक्त सत्रासाठी १०० रुपये शुल्क देखील भरायचे आहे. हे शुल्क कॅप प्रोसेसच्या वेळी ऍडजस्ट केले जाणार असल्याचे सीईटी सेलने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, '१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कालावधीत काही नसर्गिक आणि आपत्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही आणि त्यांची परीक्षा हुकली. अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही ग्रुपच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांचे हॉलतिकीट आले होते, मात्र परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करून १०० रुपये शुल्क भरायचे आहे. त्यांच्यासाठी अतिरक्त सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.