मुंबईत होणार ब्रिक्सची परिषद
By Admin | Published: April 9, 2016 03:51 AM2016-04-09T03:51:26+5:302016-04-09T03:51:26+5:30
ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांची संघटना असलेल्या ‘ब्रिक्स’ची तीन दिवसांची परिषद १४ ते १६ एप्रिल दरम्यान मुंबईत होत आहे.
मुंबई : ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांची संघटना असलेल्या ‘ब्रिक्स’ची तीन दिवसांची परिषद १४ ते १६ एप्रिल दरम्यान मुंबईत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रपरिषदेत या बाबत माहिती दिली.
ब्रिक्स देशांचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर भारतात होत असलेली ही पहिलीच परिषद असेल. शहर विकास ही या परिषदेची मूळ संकल्पना आहे. नागरी वाहतूक, पायाभूत सुविधांसाठीचे वित्तीय व्यवस्थापन, शाश्वत शहरे, परिणामकारक जनसुविधा पुरविणे, परवडणारी घरे, जमिनींचा परिणामकारक वापर या विषयांवर परिषदेत व्यापक चर्चा होईल. विविध देशांचे प्रतिनिधी आपापल्या अनुभवांचे आदानप्रदान करतील.
१४ तारखेला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू आणि स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील. पाचही देशांमधील गव्हर्नर, मंत्री, महापौर आणि वरिष्ठ अधिकारी परिषदेत सहभागी होणार आहेत. अमृत शहरे म्हणून निवड झालेल्या देशातील ४३ शहरांच्या आणि स्मार्ट सिटींच्या पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश असेल. मेक इन इंडियाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणूनही या परिषदेला महत्त्व असेल.
पत्रपरिषदेला राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय उपस्थित
होते. (विशेष प्रतिनिधी)