नगरसेविकेच्या डोक्यात पतीने घातला प्रचाराचा नारळ!
By admin | Published: February 6, 2017 04:40 AM2017-02-06T04:40:52+5:302017-02-06T04:40:52+5:30
शिवसेनेच्या उमेदवाराने वादविवादातून ठाण्यातील प्रभाग क्र. १६ च्या विद्यमान नगरसेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात नारळ मारल्याची घटना रविवारी सकाळी शांतिनगरात घडली
ठाणे : शिवसेनेच्या उमेदवाराने वादविवादातून ठाण्यातील प्रभाग क्र. १६ च्या विद्यमान नगरसेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात नारळ मारल्याची घटना रविवारी सकाळी शांतिनगरात घडली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाग क्र. १६ च्या नगरसेविका संगीता पाटील यांचा त्यांचे पती माणिक पाटील यांच्याशी गत काही वर्षांपासून कौटुंबिक वाद आहे. गत ३ वर्षांपासून ते वेगवेगळे राहतात. कौटुंबिक न्यायालयात त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. संगीता पाटील दररविवारी वॉर्डातील स्वच्छतेचा आढावा घेतात. त्यानुसार, त्या रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांसोबत शांतीनगरातील हनुमान मंदिराजवळ स्वच्छतेचा आढावा घेत असताना, रस्त्यात त्यांचे पती माणिक पाटील कार्यकर्त्यांसोबत भेटले. संगीता पाटील यांनी पतीला बाजूला होण्यास सांगितले असता त्यांच्यात वाद झाला. वाद वाढून शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली. या वादात माणिक पाटील यांनी हातातील प्रचाराचे नारळच संगीता पाटील यांच्या डोक्यात मारले. दोघांमधील भांडणातून त्यांचे कार्यकर्तेही आपसात भिडले. यात संगीता पाटील यांचे कार्यकर्ते गणेश जाधव यांनाही मारहाण झाली.
संगीता पाटील यांनी याबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माणिक पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. ठाण्यात महापालिका निवडणूक रंगात आली आहे. शिवसेनेने या वेळी संगीता पाटील या विद्यमान नगरसेविका असल्या तरी त्यांना डावलून माणिक पाटील यांना उमेदवारी दिली आहे. (प्रतिनिधी)