बैठकीचेही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

By admin | Published: July 12, 2017 12:55 AM2017-07-12T00:55:05+5:302017-07-12T00:55:05+5:30

प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरून शहराध्यक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीला पक्षाच्या अवघ्या ५ नगरसेवकांनी हजेरी लावली.

The councilors, office-bearers of the meeting, have no seriousness | बैठकीचेही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

बैठकीचेही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरून शहराध्यक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीला पक्षाच्या अवघ्या ५ नगरसेवकांनी हजेरी लावली. उर्वरित पदाधिकाऱ्यांमधीलही अनेक जण अनुपस्थित होते. त्यामुळे या बैठकीत मंथन होऊन पक्षाला संजीवनी मिळेल, नेते, पदाधिकाऱ्यांना पक्षाकडे लक्ष देण्याविषयी समज दिली जाईल अशी नव्या-जुन्या काँग्रेसजनांची अपेक्षा फोल ठरली. उलट पक्षबैठकीचे गांभीर्यच नेते, पदाधिकाऱ्यांना नसल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
शहराच्या राजकीय पटलावर काँग्रेसचे अस्तित्व दिवसेंदिवस क्षीण होत चालले आहे. त्यामुळे दुसऱ्या- तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये गेली अनेक दिवस चलबिचल सुरू आहे. काहींनी तर थेट दुसऱ्या राजकीय पक्षाची वाट धरली आहे. काँग्रेसमध्ये यायला मात्र कोणीही तयार नाही. महापालिकेच्या निवडणुकीत त्यामुळे नगरसेवकांची संख्या २९वरून थेट ९ वर आली. त्यानंतर तर पक्षाची स्थिती अधिकच गंभीर झाली आहे व तरीही नेते, पदाधिकारी स्वहित साधण्यातच मग्न आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशाने शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शहर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी काँग्रेस भवन येथे आयोजित केली होती. पक्षाच्या सर्व नगरसेवकांनाही यासाठी बोलवण्यात आले होते. शहराध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक आबा बागुल, अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेट्टी, पुरस्कृत नगरसेवक रवींद्र धंगेकर, स्वीकृत नगरसेवक अजित दरेकर, माजी उपमहापौर कमल व्यवहारे एवढीच वरिष्ठ मंडळी या बैठकीला उपस्थित होते. पक्षाच्या निवडून आलेल्या ९ नगरसेवकांपैकी फक्त ५ नगरसेवक उपस्थित होते. अन्य बहुतेक हजेरी ही विविध आघाड्यांचे प्रमुख तसेच युवक शाखेच्या पदाधिकाऱ्यांचीच होती.
अरविंद शिंदे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी ठरलेल्या मुद्द्यांची चर्चा संपल्यानंतर लगेचच निघून जाणे पसंत केले. पी. चिदंबरम यांच्यासमवेत शहरातील व्यापाऱ्यांची जीएसटी या नव्या करप्रणालीसंदर्भात बैठक आयोजित करण्याचे ठरले. ठिकाण नंतर निश्चित करण्यात येणार आहे. काही पदाधिकारी निघून गेल्यानंतर बैठक संपवण्यातच आली.
>अन्य विषय उपस्थित न करण्याची तंबी
बैठकीच्या सुरूवातीलाच शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पक्षाची स्थिती खराब आहे यासाठी बैठक आयोजित केल्याचा मुद्दा खोडून काढत तसे काही नसल्याचे स्पष्ट केले . त्यासाठी म्हणूनच उपस्थित असलेल्यांची हवा काढून घेतली. बैठकीत केवळ बूथ कमिट्या, केंद्रीय शाखेने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करण्यासाठी दिलेले कार्यक्रम, २२ जुलैला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा होणारा पुणे दौरा या मुद्द्यापुरतीच बैठक मर्यादीत राहिल, त्याशिवाय अन्य विषय कोणी उपस्थित करू नये अशी तंबीच अध्यक्षांनी उपस्थितांना दिली.
मुळातच उपस्थिती कमी व त्यातही थेट अध्यक्षांनीच बैठकीत चर्चा करायचे मुद्देच दिल्यामुळे उपस्थितांपाकी अनेकांचा बैठकीतील रसच निघून गेला. तरीही एका पदाधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयाने हमरस्त्यापासून ५०० मीटर अंतरापर्यंत केलेल्या मद्यबंदीबाबत पक्षाचे काय मत आहे असे विचारून बैठकीत गोंधळ माजवला. अरविंद शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयावर पक्ष काय बोलणार अशी विचारणा त्यांना केली, मात्र अन्य पक्ष यावर बोलत आहे, काँग्रेसकडून मात्र काहीच प्रतिक्रिया नाही.

Web Title: The councilors, office-bearers of the meeting, have no seriousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.