मतमोजणीतील गोंधळाचा निषेध, ईव्हीएमची काढली प्रेतयात्रा
By admin | Published: February 28, 2017 03:07 PM2017-02-28T15:07:20+5:302017-02-28T15:07:20+5:30
महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे मतमोजणीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत, या मुद्द्यावर भाजपा वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवार रस्त्यावर उतरले.
Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 28 - महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे (ईव्हीएम) मतमोजणीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत, या मुद्द्यावर भाजपा वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवार रस्त्यावर उतरले. ‘ईव्हीएम’व्दारे मतमोजणीतील गोंधळाचा निषेध करीत, ‘इव्हीएम ’विरोधी संघर्ष कृती समितीच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘ईव्हीएम’ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. ‘ईव्हीएम’द्वारे मतमोजणी प्रक्रियेत ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये सेटिंग करून निवडणुकीचे निकाल बदलविण्यात आले, असा आरोप करीत, निवडणुकीत पराभूत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी ‘ईव्हीएम’द्वारे मतमोजणीतील गोंधळाच्या मुद्द्यावर ‘एल्गार पुकारला आहे.
यासंदर्भात भाजपा वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप व शिवसेना इत्यादी राजकीय पक्षांसह अपक्ष पराभूत उमेदवारांच्या ‘ईव्हीएम ‘ विरोधी संघर्ष कृती समितीच्या समितीच्यावतीने २८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘ईव्हीएम’ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पराभूत उमेदवार आणि अपक्ष पराभूत उमेदवारांच्यावतीने शहरातील अशोक वाटीका येथून काढण्यात आलेली ‘ईव्हीएम ’ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा मध्यवर्ती बसस्थानक समोरुन गांधी मार्ग, पंचायत समितीसमोरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचली.
‘ईव्हीएम’व्दारे मतमोजणीचा निषेध करीत ‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव,निवडणूक रद्द करुन मतपत्रिकांव्दारे मतदान घ्या, मतदानाचा अधिकार जतन करा-हुकूमशाही बंद करा’ अशा घोषणा देत काढण्यात आलेली प्रतिकात्मक प्रेतयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर ‘ईव्हीएम’ विरोधी संघर्ष कृती समितीच्या एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना सादर करण्यात आले.
या प्रतिकात्मक प्रेतयात्रेत काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबनराव चौधरी, भारिप-बमसंचे गजानन गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय तापडिया, शिवसेनेचे तरुण बगेरे, स्वाती देशमुख, महेश गणगणे, रफीक सिद्दिकी, कपिल रावदेव, पंकज साबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादराव मते पाटील, राजेंद्र इंगोले, रामा तायडे, प्रतिभा अवचार, प्रशांत भारसाकळ, वंदना वासनिक, मनिष मोहोड,अरुंधती शिरसाट, मंगला घाटोळे, जीवन डिगे, विकास सदांशिव, मुकीम अहमद, सोमनाथ अडगावकर, बाळासाहेब इंगळे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पराभूत उमेदवार आणि अपक्ष पराभूत उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ पोलिसांनी केली जप्त!
‘ईव्हीएम’विरोधी संघर्ष कृती समितीच्यावतीने मोर्चा काढून प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ची प्रेतयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीसांनी प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ ताब्यात घेवून जप्त केली.