विद्यार्थ्यांनो 'काऊंटडाऊन'सुरु;अंतिम वर्षाच्या परीक्षेचे विषय निहाय वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 08:37 PM2020-10-03T20:37:17+5:302020-10-03T20:44:54+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १२ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १२ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठातर्फे सर्व विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही परीक्षा एकाच वेळी होणार आहेत.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांमधील अंतिम वर्षाच्या सुमारे २ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यातील सुमारे १ लाख ९३ हजार विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देणार आहेत. उर्वरित विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार असून काही विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचा पर्यायच निवडलेला नाही. पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून एका पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय दिला जाईल. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी १०० हून अधिक परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. तीनही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण होणार नाही याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.
गेल्या आठवडाभरापासून विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांना सुमारे दहा दिवस विलंब झाला आहे. कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन मागे घेतल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेचे कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यापीठातर्फे शुक्रवारी सर्व विषयांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.तसेच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातून प्रवेश पत्र (हॉल तिकीट) प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने एजन्सी निश्चित केली असून या एजन्सीकडून विद्यापीठात स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी तीन दिवस ऑनलाइन परीक्षेचा सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ऑनलाइन, ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एक सारखाच वेळ दिला आहे.
--------------------
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एक्झाम पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध करून आहे. शेड्युल अँड टाईम टेबल या लिंक वर सर्वात शेवटी 'टाईम टेबल' ही स्वतंत्र लिंक दिली आहे.त्यात बॅकलॉग आणि नियमित विद्यार्थ्याच्या परीक्षांचे वेळापत्रक आहे.
---------------------