पतसंस्थांमधून बनावट नोटा
By admin | Published: September 26, 2016 03:04 AM2016-09-26T03:04:47+5:302016-09-26T03:04:47+5:30
जिल्ह्यात येणाऱ्या बनावट नोटांचे कलेक्शन पतसंस्थांमधून होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या रॅकेटमधील पाचव्या आरोपीला शनिवारी
अहमदनगर : जिल्ह्यात येणाऱ्या बनावट नोटांचे कलेक्शन पतसंस्थांमधून होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या रॅकेटमधील पाचव्या आरोपीला शनिवारी मुंबई येथील एका पतसंस्थेच्या शाखेतून ताब्यात घेतले. तेथे लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या उद्धव सुभाष नांगरे (३१, रा़ देडगाव ता़ नेवासा) याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
नगर येथील एका पतसंस्थेच्या विविध शाखांमधून या बनावट नोटा एकत्र केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली
आहे़ पोलिसांना मिळालेल्या महितीवरून १७ आॅगस्टला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संतोष गवारे (३३, रा़ सोनई) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २ लाख ९ हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यामध्ये एक हजार व पाचशे रुपयांचे बंडल होते़ पोलिसांनी गवारेकडे चौकशी केल्यानंतर त्याने उर्वरित साथीदारांचीही नावे सांगितली.
पोलिसांनी नगर बस स्थानक व शेवगाव येथून विलास प्रभाकर प्रधान (२८, रा़ घोडेगाव), प्रवीण शशिकांत राऊत (२३, रा़ केडगाव) यांच्यासह शाहीद शेख यास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आणखी एक सूत्रधार उद्धव नांगरे याचे नाव समोर आले. आणखी पतसंस्थांमधून बनावट नोटांचे कलेक्शन केले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे़
कर्मचाऱ्यांचे कारस्थान
नांगरे हा नगर येथील एका पतसंस्थेच्या मुंबई शाखेत लिपिक आहे. विलास प्रधान हा त्याच पतसंस्थेच्या शेवगाव शाखेत होता. शेख हासुद्धा एका पतसंस्थेत नोकरीला होता़ प्रधानच्या माध्यमातून प्रवीण राऊत या रॅकेटमध्ये सामील झाला़
नगर येथील एका पतसंस्थेच्या जिल्ह्यासह राज्यात सात ते आठ शाखा आहेत़ या पतसंस्थेचे दिवसभराचे दीड ते दोन कोटी रुपये कलेक्शन आहे़ कलेक्शनमधून आलेल्या बनावट नोटा बाजूला काढल्या जातात़