देशाला स्वत:ची भाषा नाही, हे दुर्दैव: दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:49 AM2017-10-12T03:49:36+5:302017-10-12T03:50:19+5:30
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तरीही मराठी शाळा बंद पडत आहेत. भारताला प्राचीन आणि समृद्ध संस्कृती लाभली आहे. तरीही देशाला अद्याप स्वत:ची भाषा जाहीर करता आलेली नाही.
पुणे : मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तरीही मराठी शाळा बंद पडत आहेत. भारताला प्राचीन आणि समृद्ध संस्कृती लाभली आहे. तरीही देशाला अद्याप स्वत:ची भाषा जाहीर करता आलेली नाही. घटनेत नमूद केल्याप्रमाणे हिंदी ही आपली संपर्क भाषा आहे, देशाला कोणतीही स्वत:ची एक भाषा नाही, हे दुर्दैव आहे, असे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितेले.महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे महापालिका, पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे बुक फेअरचा उद्घाटन समारंभ बुधवारी गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, महापौर मुक्ता टिळक, आदी उपस्थित होते.
रावते म्हणाले, ‘घरात मूल जन्माला आल्यापासून त्याला इंग्रजी भाषा आली पाहिजे, असा अट्टाहास धरला जातो. दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत, मराठी शिक्षक अतिरिक्त आहेत, अशी ओरड करून आंदोलन केले जाते. शिक्षणमंत्री टिकेचे धनी होतात. आंदोलन का होते, याचा विचार करुन पालकांनी मुलांना मराठी शाळेत शिक्षण देण्याचा निश्चय केला पाहिजे.
स्मार्ट सिटी कळाले नाही-
स्मार्ट सिटीचा अर्थ मला कळलेला नाही. रॅम्पवर चालणाºया मुली स्मार्ट असतात, एवढेच आजवर माहित होते. सामान्य नागरिकाला सर्व जीवनावश्यक व पायाभूत सुविधा मिळाव्यात, एवढीच अपेक्षा असते. ते पुरवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करायला हवे.
-दिवाकर रावते, परिवहन मंत्री.