देश कोणाची खासगी मालमत्ता नव्हे - पवारांनी आमिर विरोधकांना सुनावले
By admin | Published: November 25, 2015 11:40 AM2015-11-25T11:40:31+5:302015-11-25T11:42:07+5:30
आमिरला भारत सोडून जाण्यास सांगणा-यांना देश म्हणजे त्यांची खासगी मालमत्ता वाटली का असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमिर विरोधकांवर निशाणा साधला.
Next
>ऑनलाइन लोकमत
कराड, दि. २५ - आमिरला भारत सोडून जाण्यास सांगणा-यांना देश म्हणजे त्यांची खासगी मालमत्ता वाटली का असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमिर विरोधकांवर निशाणा साधला. आमिरला केला जाणारा विरोध आणि त्याला देश सोडून जायला सांगणं हीच खरी असहिष्णूता असल्याचेही पवार म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडमध्ये ते बोलत होते.
देशातील असहिष्णूतेच्या वाढत्या घटनांमुळे आपण चिंतित झालो असून, पत्नी किरणने देश सोडून जाण्याबद्दल सुचवले होते, असे विधान आमिरने सोमवारी केल होते. त्याच्या या वक्तव्यानंतर काल सर्व स्तरातूंन त्याच्यावर टीकेची झोड उठत असून त्याला देशातून बाहेर जाण्याचे सल्ले देण्यात आले होते. सोशल मीडियावरही आमिरविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. शिवसेनेसारख्या पक्षाने तर आमिरला सापाची उमपा देत देश सोडायचा असेल तर पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र या विषयावर काल कोणतीही प्रतिक्रिया न देणा-या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आज आपले मत मांडले.
आमीरच्या वक्तव्यानंतर त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत, टीका केली जात आहे. त्यावरून त्याच्याच (असहिष्णूतेच्या) वक्तव्याला बळकटी मिळत आहे. या देशाने तुला एवढ पैसे दिले, असे अनेक लोक म्हणत आहेत, पण आमिरला कोणीही देणगी दिलेली नाही, त्याने केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्याला एवढे पैसे मिळाले आहेत, असे पवारांनी सुनावले. अनेक लोक आमिरला देश सोडून जायला सांगत आहेत, पण असं सांगायला देश काही कोणाची खासगी मालमत्ता नाही, असेही पवार म्हणाले.