देशाला जलस्वंयपूर्ण करणार : जलशक्ती मंत्री गजेद्रंसिंग शेखावत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 07:18 PM2019-11-07T19:18:51+5:302019-11-07T19:20:10+5:30
देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू
पुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.त्यामुळे पुढील काळात जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण केले जाईल,असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी केले.
जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पाअंतर्गत पुण्यात शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्धाटनप्रसंगी शेखावत बोलत होते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, जलशक्तीचे सचिव यु. पी सिंग, जलसंसाधन विकासचे प्रधान सचिव आय. एस. चहाल, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे वरिष्ठ सहआयुक्त राकेश कश्यप, जलशक्ती मंत्रालयाचे प्रकल्प समन्वयक अखील कुमार, आँस्ट्रेलियन दूतावास टोनी हुबेर, दिपक कुमार, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालक एन. व्ही. शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता वी.जी. रजपूत, राजेंद्र मोहिते, जल विज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता श. द भगत आदी उपस्थित होते.
शेखावत म्हणाले, पाण्याचा विषय लक्षात घेऊन जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात आले असून त्यामुळे पाण्याचे महत्व आणखी वाढले आहे. पाण्याशिवाय जीवन हे अशक्य आहे.बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचे महत्व आणखी वाढले आहे.देशात प्रदेशनिहाय पाण्याची स्थिती बदलत असून बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रात दिवाळीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू असून मार्च 2020 पर्यंत पहिल्या टप्प्यातील काम पुर्ण होणार आहे.तसेच उर्वरित काम दोन वर्षात पुर्ण होईल,असे नमूद करून शेखावत म्हणाले, येत्या 2024 पर्यंत शासनाने घराघरांत पिण्याचे पाणी देण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे. शेतीखालील पाण्याची बचत करण्यासाठी ठिंबक सिंचनाला महत्व दिले आहे. त्यावर शासन काम करत आहे.तसेच पाणी हा विषय फक्त राज्याचा राहिला नाही.
यावेळी टोनी हुबेर,यु. पी सिंग यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.प्रधान सचिव आय. एस. चहाल यांनी प्रास्तविक केले. तर खलील अन्सारी यांनी आभार मानले.