मने स्वच्छ असतील तर देश स्वच्छ होईल
By admin | Published: November 26, 2015 03:01 AM2015-11-26T03:01:17+5:302015-11-26T03:01:17+5:30
‘स्वच्छ भारत’ हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. मात्र, सर्वांची मने स्वच्छ होणार नाहीत, तोपर्यंत देश स्वच्छ होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले
पुणे : ‘स्वच्छ भारत’ हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. मात्र, सर्वांची मने स्वच्छ होणार नाहीत, तोपर्यंत देश स्वच्छ होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे आणि संवादाचा पूल बांधला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी येथे केले.
तीन विवेकवाद्यांची हत्या, देशातील असहिष्णू वातावरण, साहित्यिक, कलावंतांच्या पुरस्कार परत करण्याच्या भूमिका या पार्श्वभूमीवर गुजरातमधील ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी आणि अन्य नऊ साहित्यिकांनी ‘दक्षिणायन’ हे अभियान सुरू केले आहे. अभियानाची सुरुवात पुण्यापासून झाली. त्यात पाडगावकर अध्यक्षस्थानी होते. कोल्हापूर आणि धारवाडमध्येही हे अभियान राबवले जाणार आहे.
पाडगावकर म्हणाले, पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक, कलावंतांनी भारतीय भाषांमध्ये झोकून देऊन काम केले आहे. याआधी देशात जेव्हा जेव्हा वाईट घटना घडल्या, तेव्हा भारतातील या सर्वांनी त्याविरोधात आंदोलने केली, लेखणीतून निषेध नोंदवला. वक्तव्य करणाऱ्यापेक्षा त्याविरोधात आंदोलने करणाऱ्यांमुळेच देशाची जास्त बदनामी होते याचा गांभीर्याने विचार व्हावा, असे आवाहन पाडगावकर यांनी केले. ‘दक्षिणायन’मध्ये गुजरातमधून गणेश देवी, अनिल जोशी, उत्तम परमार, परेश नायक, प्रबोध पारीख, मानिशी जानी, कानजी पटेल, सचिन केतकर तसेच महाराष्ट्रातून विद्या बाळ, प्रज्ञा दया पवार, ज्योती सुभाष, राजन खान, अतुल पेठे, मुकुंद टाकसाळे, गणेश विसपुते, संदेश भंडारे, इब्राहिम अफगाण आदी सहभागी झाले.