देशातील सर्वात उंच निवडुंगाला फुटला कोंब!
By Admin | Published: April 6, 2017 07:04 PM2017-04-06T19:04:38+5:302017-04-06T19:13:52+5:30
देशातील सर्वात उंच निवडुंग म्हणून लिमका बुक आॅफरेकार्डमध्ये नोंद झालेल्या महाबळेश्वरातील झाडाला नुकताच नवीन कोंब फुटला आहे.
आॅनलाइन लोकमत
महाबळेश्वर (सातारा), दि. 6 : देशातील सर्वात उंच निवडुंग म्हणून लिमका बुक आॅफरेकार्डमध्ये नोंद झालेल्या महाबळेश्वरातील झाडाला नुकताच नवीन कोंब फुटला आहे. सुमारे ४७ फूट उंच असलेल्या व दिवसेंदिवस वार्धक्याकडे झुकू लागलेल्या या लिमका बुक वीरास त्याच्या नवीन कोंबासह पाहण्यासाठी निसर्गप्रेमी व अभ्यासकांची गर्दी होत आहे.
महाबळेश्वर येथील शासकीय दुग्ध शाळेच्या आवारात त्यांच्याच विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर उंच वाढलेले निवडुंग आहे. तो ३७ फूट उंचीचा असताना २००७ मध्ये तत्कालीन दुग्धशाळेचे व्यवस्थापक निवडुंगाचे पालक हनमंतराव नलवडे, सुनील राशिनकर, बाबू ढेबे-माळी, नामदेव मोरे यांनी लिमका बुक आॅफरेकार्ड कार्यालयाशी संपर्क साधून ३७ फूट वाढलेल्या या निवडुंगाची माहिती व फोटो पाठविले.
माहितीची शहानिशा व खात्री झाल्यावर त्याची देशातील सर्वात उंच निवडुंग म्हणून नोंद झाली. यापूर्वी लिमका बुकमधील २९ फूट उंच निवडुंगाचा उंच निवडुंग म्हणून विक्रम होता. तो मोडून महाबळेश्वरच्या या ३७ फूट उंच निवडुंगाने सर्वात उंच निवडुंग म्हणून बहुमान मिळविला. त्यानंतर हा विक्रम कायम आहे.
एवढे करूनही तो थांबला नाही. आकाशात उंच-उंच गवसणी घेण्याची त्याची ओढ कायमच आहे. तो आत्ता ४७ फूट उंच झाला आहे. त्याला उन्हाळी हंगामात ब्रह्मकमळासारखी मोठी व पांढरी शुभ्र भरपूर फुले येतात. त्यावेळेसही तो अत्यंत विलोभनीय दिसतो.
निसर्ग नियमानुसार आता हा ह्यलिमका वीरह्ण वार्धक्याकडे झुकू लागला आहे. या विक्रमवीराने तीन नवीन कोबांना जन्म दिला असून, ते मूळ निवडुंगाच्या तळातून फुटल्याने त्यांच्या बद्दलचे कुतूहल वाढले आहे. भविष्यात हे कोंबही उंचीचा वारसा जपणार का? याचे कुतूहल पर्यावरणप्रेमींना वाटत आहे. तो आपल्याच सध्याचा उंचीचा विक्रम मोडेल त्यावेळी आम्ही ही त्याच्या बालपणाचे साक्षीदार आहोत, हे अभिमानाने सांगता यावे, यासाठी निसर्गप्रेमी व अभ्यासकांची ते पाहण्यास व त्याची आपल्या समवेत छबी काढण्याची येथे येत आहेत. कारण वीस वर्षांपूर्वी दुग्धशाळा विश्रामगृह परिसरात आलेले निवडुंगाचे कोंब तो एवढा उंच वाढून होईल, असे कोणालाही वाटले नव्हते.
कोंबाच्या वाढीवर वनस्पती शास्त्रज्ञांचे लक्ष
या विक्रम वीराने तीन कोंबांना जन्म दिल्याने भविष्यात याचे निश्चितच साक्षीदार होण्याची संधी आजच्या निवडुंग अभ्यासकांना मिळू शकते हा आशावाद असल्याने ते या नवीन आलेल्या कोंबाकडे त्या दृष्टीने पाहत आहेत. अनेक वनस्पती शास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेवून आहेत. सध्या हे तीन कोंब व त्यासमवेत हा ४७ फुटांचा लिमका बुक विक्रम वीर असे अत्यंत आगळेवेगळे व मनमोहक चित्र येथे पाहावयास मिळत आहे.