अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा देशव्यापी मागणी दिवस
By admin | Published: July 10, 2017 02:32 AM2017-07-10T02:32:51+5:302017-07-10T02:32:51+5:30
अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनचा देशव्यापी मागणी दिवस १० जुलै रोजी साजरा केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनचा देशव्यापी मागणी दिवस १० जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. मागणी दिनानिमित्त अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मुंबई जिल्हा समितीने सोमवारी आझाद मैदानात निदर्शनांची हाक दिली आहे.
या आंदोलनात संपूर्ण मुंबई शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस दुपारी ३ वाजता आझाद मैदानात निदर्शने करतील, अशी माहिती संघटनेच्या राज्य महासचिव शुभा शमीम यांनी दिली. त्या म्हणाल्या की, आयसीडीएस योजना कायम करून तिचा दर्जा सुधारण्याची कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. दरम्यान, मानधनवाढ समिती व कृती समितीच्या शिफारशीनुसार मानधनवाढ मंजूर करण्याची मागणीही समितीने केली आहे.
मागणी दिनानिमित्त शासनाने पुढाकार घेऊन ठरल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना मानधनवाढीची भेट द्यावी, असे आवाहन शमीम यांनी केले आहे. सोबतच शासनाने टीएचआर (टेक होम रेशन) बंद करून, सर्व लाभार्थ्यांना ताजा शिजवलेला आहार द्यावा. मुले टीएचआर खात नसून फेकून देत असल्याचे कित्येक वेळा समितीने सिद्ध करून दाखवले आहे. तरीही शासनाने टीएचआरचा बालहट्ट सोडून मुलांना ताजा शिजविलेला आहार देण्याचे आवाहन समितीने केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अंगणवाडीत दोन वेळच्या आहारासाठी सध्या प्रतिविद्यार्थी फक्त ४ रुपये ९२ पैसे इतका निधी खर्च केला जात असून, हा दर अपुरा आहे. तरी या दरात तिपटीने वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.