देशव्यापी मोर्चा : पर्ल्स गुंतवणूकदारांची सेबीवर धडक, पैसे परत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:33 AM2018-02-27T03:33:43+5:302018-02-27T03:33:43+5:30
पर्ल्स कंपनीच्या मालमत्तेचा तत्काळ लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावेत, या मागणीसाठी जनलोक प्रतिष्ठान संघटनेने वांद्रे-कुर्ला संकुल येथील सेबीच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला.
मुंबई : पर्ल्स कंपनीच्या मालमत्तेचा तत्काळ लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावेत, या मागणीसाठी जनलोक प्रतिष्ठान संघटनेने वांद्रे-कुर्ला संकुल येथील सेबीच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला. पर्ल्स कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांना पैसे मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप संघटनेच्या अध्यक्षा सुनंदा कदम यांनी मोर्चावेळी केला आहे.
कदम म्हणाल्या की, आॅस्ट्रेलिया येथील हॉटेल शेरेटॉन मिराज या मालमत्तेच्या विक्रीतून सुमारे ४०० कोटी रुपये तेथील न्यायालयाच्या एस्क्रो अकाउंटमध्ये जमा आहेत. मात्र सेबीच्या हलगर्जीपणामुळे तेथील पैसा भारतामध्ये आणण्यास विलंब होत आहे. सेबीने कंपनीच्या ६ कोटी गुंतवणूकदारांच्या रकमेचा परतावा व्याजासह करण्याची जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळे सेबीच्या मनमानी कारभारामुळे ‘पर्ल्स प्रकरणातून सेबी हटाव’ आंदोलन करण्यात आले.
सेबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुमारे ६ कोटी गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. चार वर्षांपूर्वी कंपनीविरोधात सीबीआय व सेबीने चौकशी सुरू केली. या प्रकरणी ९० दिवसांमध्ये कंपनीच्या मालमत्तांची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती आर.एम. लोढा यांची समिती स्थापन करून कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून ६ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशाला दोन वर्षे उलटल्यानंतरही समितीकडे केवळ ३७० कोटी रुपये जमा झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांच्या हक्काचे पैसे परत देण्यासाठी सेबी तांत्रिक पद्धतीने टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.