श्रमिक कायद्यासाठी देशव्यापी यात्रा
By admin | Published: July 13, 2017 01:44 AM2017-07-13T01:44:45+5:302017-07-13T01:44:45+5:30
सामाजिक सुरक्षा कायदा लागू करावा आणि पथ विक्रेता कायदा देशभरात लागू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : सामाजिक सुरक्षा कायदा लागू करावा आणि पथ विक्रेता कायदा देशभरात लागू झाला आहे. मात्र, देशातील अनेक राज्यांना याची माहिती नाही. अधिकारी व विक्रेत्यांना याची माहिती व्हावी व देशपातळीवर सक्षम अंमलबजावणी व्हावी यासाठी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी देशव्यापी यात्रा काढण्याचा निर्धार नॅशनल हॉकर्स फेडरेशन आयोजित दिल्ली येथील तीन दिवसीय कार्यशाळेत घेण्यात आला.
राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष, महाराष्ट्राचे काशिनाथ नखाते, ओरिसाचे जयन्तो दास, कर्नाटकचे मेधा रॉय, तेलंगणचे इनायत अली, उत्तर प्रदेशचे राविशंकर द्विवेदी, पंजाबचे इंद्र पाल, पश्चिम बंगालचे देवाशिष दास, उत्तराखंडचे प्रमोद अग्निहोत्री, झारखंडच्या अनिता दास, हिमाचल प्रदेशचे प्रवेश चेंदेल, राजस्थानचे मोहम्मद याकुब आदींसह २६ राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तेलंगणा भवनात झालेल्या कार्यशाळेत विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीची माहिती दिली. महाराष्ट्र
फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते म्हणाले, ‘‘राज्य शासनाची योजना कायद्यास धरून नाही. यात प्रशासनास जास्त अधिकार दिले आहेत. त्यात सुधारणा करून शहर फेरीवाला समितीस देण्यात यावेत.’’
शक्तीमान घोष म्हणाले, देशातील श्रमिकांकडे दुर्लक्ष होत असून काही कायदे अडवले जात आहेत. काही कायदे रद्द केले जात असून काहींची अंमलबजावणी केली जात नाही. जनतेच्या प्रश्नांचे भांडवल करून सत्तेत आलेल्यांना आता विसर पडला आहे. देशातील असंघटितांना सामाजिक सुरक्षा गरजेची असून देशभरात फेरीवाल्यांसाठी विकास आराखड्यात २.५ टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक असताना त्यात टाळाटाळ केली जात आहे. देशभरात पथविक्रेता कायदा लागू झाला असताना विविध राज्यांत वेगवेगळी परिस्थिती आहे. याचे प्रमुख कारण मानसिकता. अनेक राज्यात चांगले काम होत आहे. मात्र अनेक ठिकाणी दुर्दशा आहे.