त्यांच्यासाठी न्यायालयच आले खाली
By admin | Published: July 8, 2017 10:22 PM2017-07-08T22:22:41+5:302017-07-08T22:22:41+5:30
महालोकअदालतीमध्ये अपंग असलेल्या ज्येष्ठ महिलेला न्याय देण्यासाठी न्यायालयच दोन मजले उतरून खाली आले
Next
>ऑनलाइन लोकमत
अपंग महिला : महालोकअदालतीत मिळाला न्याय
पुणे, दि. 8 - न्याय मिळविण्यासाठी एरवी पक्षकारांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. मात्र, महालोकअदालतीमध्ये अपंग असलेल्या ज्येष्ठ महिलेला न्याय देण्यासाठी न्यायालयच दोन मजले उतरून खाली आले. तिचे म्हणणे ऐकून घेऊन तिलाही न्यायही दिला. न्यायालयाची एक वेगळी बाजू शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये पक्षकारांना पाहायला मिळाली.
हौसाबाई छबू पशाले (वय ६०, रा. आढळे खुर्द, ता. मावळ) असे न्याय मिळालेल्या त्या महिलेचे नाव आहे. हौसाबाई ११ मार्च २०१५ रोजी नातेवाईकाच्या लग्नासाठी कारमधून कुटुंबियांसोबत निघाल्या होत्या. त्यावेळी समोरून येणाºया इनोव्हा गाडीने त्या कारला धडक दिली. त्यामध्ये हौसाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मणख्याला दुखापत झाली. उपचारावर मोठा खर्च केला. तरीही त्यांना चालता येत नव्हते. नीट बसता येत नव्हते. त्यांनी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी अॅड. तुषार पाचपुते यांच्यामार्फत १७ जून २०१५ रोजी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. मात्र, अपंगत्वामुळे हौसाबाई यांना न्यायालयात हजर राहणे शक्य नव्हते. याबाबतची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला देण्यात आली होती. शनिवारी महालोकअदालतमध्ये कारमधून हौसाबाई यांना शिवाजीनगर न्यायालयातील नवीन इमारतीच्या समोर हजर करण्यात आले. त्यावेळी दुसºया मजल्यावर त्यांना नेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी पॅनेलचे सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी, हर्षदा वैद्य, प्राजक्ता कुलकर्णी दुसºया मजल्यावरून खाली उतरून नवीन इमारतीच्या पुढे आले. हौसाबाई यांचे म्हणणे जाणून घेतले. तडजोडीअंती त्यांना ६ लाख ५० हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. त्यावेळी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.आर.अष्टुरकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़ राजेंद्र दौंडकर, विशेष न्यायाधीश एम.डब्ल्यू. चांदवाणी, विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात, न्यायमूर्ती एस.एच. ग्वालानी, न्यायमूर्ती ए. एस. महात्मे, न्यायमूर्ती जहागिरदार, अर्जदाराचे वकील तुषार पाचपुते, अॅड. मयुर खांडरे, रिलायन्स कंपनीकडून अॅड. हृर्षिकेश गानू उपस्थित होते. हा खटला तडजोडीने लवकरात लवकर सुटावा, यासाठी रिलायन्स कंपनीनेही पुढाकार घेतला होता. कंपनीचे अधिकारी जून महिन्यात मुंबई येथून पुणे येथे आले होते, असे अॅड़ गानू यांनी सांगितले.