युतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात
By admin | Published: January 22, 2017 08:34 PM2017-01-22T20:34:15+5:302017-01-22T20:34:42+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा- सेना युतीच्या निर्णयावर अद्यापही शिक्कामोर्तब झालं नाही.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा- सेना युतीच्या निर्णयावर अद्यापही शिक्कामोर्तब झालं नाही. याआधीही युतीसंदर्भात भाजपा आणि सेना नेत्यांदरम्यान तीन बैठक झाल्या. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. उलट भाजपा आणि सेना नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करणं सुरूच ठेवले आहे. भाजपाने शिवसेनेला 50-50चा फॉर्म्युला दिला होता. मात्र तो फेटाळत शिवसेनेनं भाजपाला 60 जागांचा प्रस्ताव दिला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला.
त्यासंदर्भातच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपा नेत्यांची जवळपास 4 तास आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई भाजपाच्या निवडणूक समिती, आमदार आणि खासदार यांच्याकडून संघटन आणि निवडणूक कामाचा आढावा घेतला. बैठकीत 227 जागांचा वॉर्डनिहाय, बुथनिहाय आढावा घेण्यात आला असून, भाजपाचा जाहीरनामा, उमेदवार, पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली आहे.
राज्यातील पदाधिकाऱ्यांची रात्री 9 वाजता पुन्हा बैठक होत आहे. युतीबाबत भाजपा आश्वासक असून याबाबत पुढील निर्णय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेतील, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत. आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहेत. मात्र अद्याप दोन्ही पक्षांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय, याबाबतही जनतेच्या मनात संभ्रम कायम आहे.