कोर्ट चित्रपटातील प्रमुख अभिनेते, विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ते विरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 10:56 AM2021-04-13T10:56:25+5:302021-04-13T10:57:35+5:30
विरा साथीदार यांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशी; नागपूरच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोर्ट चित्रपटाचे प्रमुख अभिनेता आणि विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून विख्यात विरा साथीदार यांचे आज कोरोनाशी झुंज देताना निधन झाले. नागपुरातील एम्समध्ये काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वीरा यांनी 19 मार्चला कोरोना लस घेतली होती आणि त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
वर्धा जिल्ह्यातील एका खेड्यात अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या वीरा यांनी त्यांचे आयुष्य संघर्षात घालविले. नागपूरला कामासाठी आलेल्या वीरा यांचे नाते आंबेडकरी चळवळीशी जुळले. शेकडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. बंडखोर कार्यकर्ता म्हणून त्यांचे व्यक्तित्व होते. चैतन्य ताम्हाणे यांच्या कोर्ट या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पोहचला होता. यानंतरही चळवळीशी संबंधित चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे. मात्र अभिनेता म्हणवून घेण्यापेक्षा आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणे त्यांना आवडायचे. त्यांच्या अचानक निधनाने चळवळीचा विद्रोही आणि लढाऊ कार्यकर्ता हरवल्याची शोक भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.