राबिया खानला न्यायालयाची नोटीस
By admin | Published: January 28, 2017 03:53 AM2017-01-28T03:53:41+5:302017-01-28T03:53:41+5:30
पांचोली कुटुंबीयांची बदनामी केल्याबद्दल झरीना वहाब व आदित्य पांचोलीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने
मुंबई : पांचोली कुटुंबीयांची बदनामी केल्याबद्दल झरीना वहाब व आदित्य पांचोलीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेत्री जिया खानची आई राबिया खानला शुक्रवारी नोटीस बजावली.
राबिया खान सोशल साईट्सवर पांचोली कुटुंबीयांची विशेषत: सूरज पांचोलीची सतत बदनामी करत असल्याने तिच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, यासाठी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात झरीना वहाब आणि अदित्य पांचोली यांनी राबियाविरुद्ध अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. गौतम पटेल यांच्यापुढे होती.
याचिकेनुसार, राबियाने पांचोली कुटुंबीयांची बदनामी न करण्याचे आश्वासन यापूर्वीच न्यायालयाला दिले आहे. पांचोली कुटुंब व विशेषत: सूरज याच्याविरुद्ध कोणतीही टिप्पणी न करण्याचा तसेच जिया व सूरजच्या नात्यासंबंधी कोणताही प्रतिकूल माहिती उघड न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राबिया खान यांना दिला होता व तसे आश्वासनही तिने न्यायालयाला दिले होते. ‘तरीही राबिया तिच्या टष्ट्वीटर अकाऊंटवरून आणि प्रसारमाध्यामांना माहिती देऊन पांचोली कुटुंबीयांना बदनाम करत आहे,’ असा युक्तिवाद पांचोलीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला. २०१४ मध्ये झरीना व आदित्यने राबियाविरुद्ध बदनामीचा दावा दाखल केला आहे. याचिकेत, राबिया तिच्या टष्ट्वीटर अकाऊंटवरून सूरज व पांचोली कुटुंबीयांना शिवीगाळ करते असे नमूद करण्यात आले आहे. न्या. पटेल यांनी राबियाला ३ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)