कोपर्डी प्रकरणी आजपासून न्यायालयीन कामकाज
By Admin | Published: October 18, 2016 05:09 AM2016-10-18T05:09:29+5:302016-10-18T05:09:29+5:30
कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या खटल्याप्रकरणी मंगळवारपासून न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होणार
अहमदनगर : कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या खटल्याप्रकरणी मंगळवारपासून न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मंगळवारी न्यायालयात आरोपींना सादर केले जाणार आहे.
आरोपींचे वकीलपत्र कोण घेणार?, तेही यावेळी निश्चित होण्याची शक्यता आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते स्वत: मंगळवारी न्यायालयात येणार आहेत. दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर सादर करुन दोषनिश्चिती केली जाते.
मात्र, कोपर्डी प्रकरणातील तीन आरोपींपैकी दोघांचे आरोपपत्र अद्याप कुणीही घेतलेले नाही. त्यामुळे आरोपींचे आरोपपत्र कोण घेणार? ते मंगळवारी स्पष्ट होईल. आरोपींना वकील न मिळाल्यास ते सरकारकडे वकिलाची मागणी करु शकतात. त्यानंतरच दोषनिश्चितीची प्रक्रिया होईल.
हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, तसा निर्णय अद्याप झालेला नाही.
बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पास्को) निकाल सहा महिन्यात लावण्याचे बंधन आहे. त्यामुळे नियमित न्यायालयातही या खटल्याचा निकाल लवकरच लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)