गुडघ्यांवर चालत आरोपीने गाठले न्यायालय

By admin | Published: October 14, 2014 01:01 AM2014-10-14T01:01:49+5:302014-10-14T01:01:49+5:30

मोबाईल हिसका देऊन पळवून नेण्याच्या प्रकरणातील एका आरोपीने चक्क गुडघ्यांवर चालत जाऊन न्यायालयात हजर होणे पसंत केले. या आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जे. आर. घाडगे यांच्या न्यायालयाने

Court reached on the knees by the accused | गुडघ्यांवर चालत आरोपीने गाठले न्यायालय

गुडघ्यांवर चालत आरोपीने गाठले न्यायालय

Next

नागपूर : मोबाईल हिसका देऊन पळवून नेण्याच्या प्रकरणातील एका आरोपीने चक्क गुडघ्यांवर चालत जाऊन न्यायालयात हजर होणे पसंत केले. या आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जे. आर. घाडगे यांच्या न्यायालयाने १५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पवनजितसिंग ऊर्फ मायकल जोगेंदरसिंग सुदान (१९) असे आरोपीचे नाव असून, तो दीपकनगर नारी रोड येथील रहिवासी आहे. त्याला आणि एका बालगुन्हेगाराला काल जरीपटका पोलिसांनी अटक करून, त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे १२ मोबाईल जप्त केले होते. पवनजितसिंग हा १६ वर्षांच्या एका बालगुन्हेगाराला मोटरसायलवर डबलसीट बसवायचा आणि त्याला रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्यांचे मोबाईल हिसकावण्यास सांगायचा. या दोघांनी १० आॅक्टोबर रोजी भीम चौकाकडे शिकवणी वर्गासाठी सायकल हातात घेऊन पायी जाणाऱ्या मिसाळ ले-आऊट येथील प्रतीक भरत मेश्राम याचा १२ हजार ५९० रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. त्यानंतर त्यांनी आणखी तीन जणांचे मोबाईल हिसकावले होते.
आरोपींकडून १२ मोबाईल, एक मोटरसायकल, असा एकूण ६९ हजार ९४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या आरोपीला न्यायालयात घेऊन जाण्यासाठी जरीपटका पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीतून बाहेर काढणे फारच मुश्कील झाले होते. तो बाहेरच निघत नव्हता. मानवाधिकाराचे पालन म्हणून पोलिसांनी त्याला कोठडीतून बाहेर काढण्यासाठी त्याच्या वडिलांना बोलावले होते. तो वडिलांनाही जुमानत नव्हता. मोठ्या मुश्किलीने तो कोठडीच्या बाहेर आला.
पवनजितसिंगला दोरखंड बांधून पोलीस वाहनातून न्यायालयात नेण्यात आले. न्यायमंदिर इमारतीच्या कम्पाऊंड गेटपासून तर दगडी इमारतीतील न्यायालय क्रमांक ७ पर्यंत तो गुडघ्यांवर चालत गेला. प्रारंभी तो अडला होता. त्याने पोलिसांनाही स्वत:च्या डोक्यावर रुमाल ठेवण्यास भाग पाडले. पोलीस पायी चालण्यास म्हणत होते, परंतु तो जुमानत नव्हता. वडिलही वारंवार त्याला विनवणीही करीत होते. उपनिरीक्षक आर. के. ठाकूर यांनी या आरोपीला न्यायालयात हजर केले.
न्यायासनासमोरही तो गुडघ्यांवरच होता. न्यायालयालाही त्याने जुमानले नाही. त्याला न्यायालयाने १५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दोरखंडात गुडघ्यांवर चालत जाणारा हा आरोपी न्यायालय परिसरात चर्चेचा विषय ठरला. वडील आणि न्यायालयाला आपण निरपराध आहोत हे दाखविण्यासाठी तो नाटक करीत आहे, असे लोक म्हणत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Court reached on the knees by the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.