नगरपालिकेच्या कार्यवाहीमुळे न्यायालय समाधानी
By admin | Published: May 20, 2016 02:10 AM2016-05-20T02:10:40+5:302016-05-20T02:10:40+5:30
कचरा कुंभारवळण येथील प्रक्रिया केंद्रात नेण्याच्या आदेशाचे नगर परिषदेने पालन केल्याची माहिती परिषदेच्या वतीने हरित लवादाकडे सादर करण्यात आली
सासवड : येथील कचरा कुंभारवळण येथील प्रक्रिया केंद्रात नेण्याच्या आदेशाचे नगर परिषदेने पालन केल्याची माहिती परिषदेच्या वतीने हरित लवादाकडे सादर करण्यात आली. त्या वेळी न्यायमूर्तींनी समाधान व्यक्त केले, अशी माहिती मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.
सासवडचा कचरा कुंभारवळण येथे नेण्यास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. मात्र, हरित लवादाने या प्रक्रिया केंद्रात कचरा नेण्याचा आदेश दिला होता. कुंभारवळण येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे, ही प्रक्रिया योग्य होते किंवा नाही, याची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी, असे आदेशही लवादाने दिले आहेत.
या कचराप्रक्रिया केंद्राबाबत कुंभारवळण पंचक्रोशीतील नागरिकांना आपले म्हणणे मांडावयाचे आहे. हरित न्यायालयाकडे याचिका दाखल करणारे सासवड येथील
डॉ. उदय जगताप यांनी या गावकऱ्यांना प्रतिवादी केल्यास त्यांचे म्हणणे ऐकता येईल, असेही
लवादाने स्पष्ट केले. आता पुढील सुनावणी ३० तारखेला होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.
सासवड येथील कचरा डेपो
बंद करावा, अशी मागणी जगताप यांनी केली. त्याचा पाठपुरावा केला. नगर परिषदेने प्रयत्न केले.
शासकीय अधिकऱ्यांनी त्यांची कामे व्यवस्थित केली म्हणून सासवड येथील शेतकरी संघटनेचे
अध्यक्ष दिलीप गिरमे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
स्वच्छ भारत अंतर्गत स्वच्छ सुंदर आणि सांडपाणी, मैलापाणी प्रदूषण मुक्त सासवड करावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. (वार्ताहर)