Jaydeep Apte : जयदीप आपटेचा आता कोठडीत मुक्काम, कोर्टाने काय दिला निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 03:49 PM2024-09-05T15:49:49+5:302024-09-05T15:51:47+5:30
Jaydeep Apte Latest News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने जयदीप आपटेची पोलीस कोठडीत रवानगी केली.
Jaydeep Apte Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप आपटे हा फरार होता. बुधवारी (४ सप्टेंबर) सायंकाळी त्याला अटक केल्यानंतर आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर पोलिसांनी पुतळा बनवणाऱ्या जयदीप आपटेविरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आपटे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.
कल्याणमध्येच केली अटक
दरम्यान, जयदीप आपटे कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तो राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात तळ ठोकला. बुधवारी सायंकाळी जयदीप आपटे हा घराजवळ आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
कल्याण पोलिसांनी मालवण पोलिसांच्या केले हवाली
जयदीप आपटे विरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. त्याला कल्याण पोलिसांनी अटक केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याला मालवण पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मालवण पोलीस त्याला कल्याणवरून मालवणला घेऊन गेले. मालवण न्यायालयसमोर त्याला हजर करण्यात आले.
जयदीप आपटेची पुतळा दुर्घटनेप्रकरणी चौकशी करायची असल्याचे सांगत पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली होती. मालवण न्यायालयाने त्याला ६ दिवसांची म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाईल.