१६ कैद्यांचे जबाब नोंदविण्यास न्यायालयाचा हिरवा कंदील
By admin | Published: July 14, 2017 05:35 AM2017-07-14T05:35:03+5:302017-07-14T05:35:03+5:30
दंगलीच्या गुन्ह्यांत अखेर १६ जणींचे जबाब नोंदविण्यास गुन्हे शाखेला न्यायालयाकडून गुरुवारी हिरवा कंदील मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण आणि त्यानंतर झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यांत अखेर १६ जणींचे जबाब नोंदविण्यास गुन्हे शाखेला न्यायालयाकडून गुरुवारी हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे.
मंजुळाच्या हत्येप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत जेलर मनीषा पोखरकरसहित सहाही जणी पोलीस कोठडीत आहेत. शुक्रवारी त्यांची कोठडीची मुदत संपत आहे. मंजुळाच्या हत्येसह भायखळा कारागृहात घडलेल्या दंगलीचा तपासही गुन्हे शाखेकडे आहे. या प्रकरणात तब्बल २९१ कैद्यांचे जबाब नोंदविण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळत नव्हती. या कैद्यांच्या विभागीय गुन्हेगारीनुसार त्यांची वर्गवारी करण्यात आली. वर्गवारीनुसार संबंधित कैद्यांची जबाबदारी गुन्हे शाखेच्या १२ही कक्षांना वर्ग करण्यात आली
होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे सर्व पथक या महिला कैद्यांचे जबाब नोंदवून घेत आहे. तसेच या प्रकरणातील अन्य १६ जणींचे जबाब नोंदविण्यासाठीही गुन्हे शाखेला गुरुवारी न्यायालयाकडून परवानगी मिळाली.
कारागृह अधीक्षक सुटीवर...
मंजुळा शेट्येला मारहाण झाली त्या दिवशी भायखळा कारागृहाचे अधीक्षक इंद्रमणी इंदुरकर सुटीवर होते. तिच्या मृत्यूनंतर त्यांना रात्रीच घटनेबाबत समजले होते. त्या वेळेस हजर राहणे अपेक्षित असतानाही ते हजर राहिले नाहीत. ते दुसऱ्या दिवशी कामावर रुजू झाले. तसेच त्यांनी वरिष्ठांनाही अपुरी माहिती पुरविल्याचे कारागृहात सुरू असलेल्या अंतर्गत चौकशीतून समोर येत आहे.