साहित्य संमेलन वादावर आता पडदा टाका !
By admin | Published: January 14, 2016 02:31 AM2016-01-14T02:31:00+5:302016-01-14T02:31:00+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत कसलेही वाद निर्माण होणे योग्य नाही. संमेलनाध्यक्षांच्या काही वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण झाला होता
मुंबई/पुणे : अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाबाबत कसलेही वाद निर्माण होणे योग्य नाही. संमेलनाध्यक्षांच्या काही वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण झाला होता, परंतु त्यांनी आता माफी मागितली असल्याने सर्व वादावर पडदा टाका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.
साहित्य संमेलनाला मी जाणार नाही, असे कधीही म्हटलेले नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्र्यांनी संमेलनाला जाणार असल्याचे संकेत मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिले. तर पुण्यात भाजपाचे खा. अमर साबळे यांनीही वादावर पडदा टाकल्याचे सांगितले. इतर साहित्यिकांबरोबर सबनीस यांचेही स्वागत करू, असे साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र यापुढे भाषणातून वादग्रस्त विधान येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही दिला. भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले, की साहित्य संमेलनाच्या आयोजनाला आमचा कधीच विरोध नव्हता. सबनीस यांनी मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला आमचा आक्षेप होता. त्यांनी स्वत:च्या प्रसिध्दीसाठी पंतप्रधानांबाबत असे विधान केले. (विशेष प्रतिनिधी)
महामंडळाच्या कारभाराविरोधात तक्रार
काही साहित्यिकांनी एकत्र येत महामंडळाच्या कारभाराविरोधात विठ्ठलभाई पटेल मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाय संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य आणि निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद अडकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. मुरलीधर साठे, अनिल कुलकर्णी आणि अशोक मुळे यांनी ही तक्रार केली असून, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, महेश केळुस्कर, सुहास सोनावणे, अरुण म्हात्रे, भारत सासने, राजन खान, अॅड. सतीश गोराडे, मुकुंद आवटे अशा साहित्यिकांनी तक्रारीस पाठिंबा दिला आहे.
संमेलनात आपण स्वत: उपस्थित राहू. अगदी सबनीसांचेही स्वागत आम्ही करू. हे संमेलन दिमाखात पार पाडण्यासाठी भाजपा व सरकार म्हणून जी काही मदत लागेल ती करण्यास तयार आहे.
- खा, अमर साबळे, भाजपा