कापसाचा हमीभाव उत्पादन खर्चाएवढाही नाही

By Admin | Published: February 6, 2015 02:15 AM2015-02-06T02:15:12+5:302015-02-06T02:22:17+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळय़ात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शेतक-यांची व्यथा.

Coverage of cotton does not amount to the cost of production | कापसाचा हमीभाव उत्पादन खर्चाएवढाही नाही

कापसाचा हमीभाव उत्पादन खर्चाएवढाही नाही

googlenewsNext

विवेक चांदूरकर / अकोला:
सर्व राज्यांमधील कापूस पिकाचा उत्पादन खर्च आणि उत्पादकता लक्षात घेऊन केंद्र सरकार हमी भाव जाहीर करते. राज्यात कापूस हे प्रमुख पीक असले, तरी या पिकाचे उत्पादन कमी आहे. दुसरीकडे उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमी भावात शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनीच गुरूवारी अकोला येथे दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत समारोहाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेती व्यवसायातील समस्या व त्यावरील उपाययोजनांवर विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणाले, कापूस हे राज्यातील प्रमुख पीक आहे. कापसाचे हमी भाव केंद्र सरकार घोषित करते. हे भाव घोषित करताना केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांमधील कापसाचे उत्पादन व त्यासाठी येणारा खर्च याची माहिती घेऊन शेतकर्‍यांना परवडेल असे हमी भाव जाहीर करते. यावर्षी कापसाला केंद्र सरकारने ४0५0 रुपये हमी भाव जाहीर केला.
राज्यात कापसाचे एकरी उत्पादन अन्य राज्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शासन जाहीर करीत असलेले हमी भाव शेतकर्‍यांना परवडत नाहीत, तसेच या हमी भावात शेतकर्‍यांना दोन पैसेही उरत नाहीत. राज्यात बीटी बियाण्यांमुळे कापसाचे उत्पादन वाढले खरे, मात्र उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे उत्पादन वाढविणार्‍या बियाण्यांवर आणखी संशोधन करण्याची गरज आहे. विद्यापीठाने ते काम करायला हवे. शेतकर्‍यांनीही उत्पादन वाढविण्यावर भर द्यायला हवा. नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करण्याची गरज असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. विद्यापीठाने केलेले संशोधन केवळ कागदावर असून, ते शेतात जाणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Web Title: Coverage of cotton does not amount to the cost of production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.