कुंचल्याचा जादुगार!

By admin | Published: July 24, 2016 04:52 AM2016-07-24T04:52:04+5:302016-07-24T04:52:04+5:30

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे ‘कॅनव्हास’वरील रंगाइतकेच ‘लोकमत’ समूह आणि नागपूरसोबत रझा यांचे नाते सखोल होते. सय्यद रझा शरीररूपाने जगात नसले

Covert witch! | कुंचल्याचा जादुगार!

कुंचल्याचा जादुगार!

Next

नागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे ‘कॅनव्हास’वरील रंगाइतकेच ‘लोकमत’ समूह आणि नागपूरसोबत रझा यांचे नाते सखोल होते. सय्यद रझा शरीररूपाने जगात नसले तरी त्यांच्या कलाकृतींची छाप सर्वांच्या मनात सदैव कायम राहील. ‘लोकमत’तर्फे कलेच्या या जादुगाराला भावपूर्ण श्रद्धांजली.
नागपुरातूनच सय्यद रझा यांनी आपल्या कलात्मक प्रवासाची सुरुवात केली होती. त्यामुळेच अखेरपर्यंत नागपूरच्या मातीबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. त्यांच्या बोलण्यात नेहमी नागपूरचा विषय यायचा. उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नागपूर स्कूल आॅफ आर्टस येथे प्रवेश घेतला होता. १९३९ ते १९४३ या कालावधीत त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सर जे.जे.स्कूल आॅफ आर्ट येथे प्रवेश घेतला व तेथे ते १९४३ ते १९४७ या कालावधीत शिक्षण घेतले. त्यानंतर १९५० मध्ये फ्रान्स सरकारकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली व आॅक्टोबर १९५० मध्ये ते पॅरिसमधील
जगप्रसिद्ध ‘इकोल नॅशनल सुपिरिअर डे ब्यू
आटर््स’ येथे पुढील अभ्यासासाठी गेले. १२ मार्च २०१० रोजी सय्यद हैदर रझा ‘लोकमत’च्या आमंत्रणावरून नागपुरात आले होते. येथे आल्यावर त्यांनी नागपूरच्या सोनेरी आठवणी सांगितल्या होत्या. यावेळी त्यांनी जवाहरलाल दर्डा कला अकादमीतर्फे आयोजित ‘श्लोक’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले होते आणि नव्या कलाकारांना प्रेरणा दिली होती.

जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनचा रझा पुरस्कार
१२ मार्च २०१० रोजी सय्यद हैदर रझा नागपूरला आले तेव्हा त्यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे तसेच ‘जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन’चे चेअरमन विजय दर्डा यांच्यासोबत आठवणीत राहण्याजोगे क्षण घालविले होते. रझा यांचे कलेसाठी असलेले प्रेम पाहून, नवोदित कलाकारांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विजय दर्डा यांनी जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनतर्फे रझा पुरस्कारांची घोषणा केली. रझा पुरस्कारांतर्गत दरवर्षी सय्यद रझा यांच्या वाढदिवशी म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी देशभरातील उदयोन्मुख कलाकारांना सन्मानित करण्यात येते. यात ५ लाखांच्या रोख पुरस्काराचादेखील समावेश आहे. दिल्लीचे कलाकार बी.मंजूनाथ कामत यांना सर्वात पहिला रझा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. १३ सप्टेंबर २०११ रोजी दिल्ली येथे त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
रझा यांची ती मौलिक कलाकृती
सय्यद हैदर रझा नागपुरात आले असताना त्यांनी येथे विशेष कलाकृती तयार केली होती. रझा यांनी आपल्या कुंचल्यातून अप्रतिम कलाकृती साकारली व विजय दर्डा यांच्यासमवेत घालविलेले क्षण गोड आठवणींमध्ये बदलले. या कलाकृतीला रझा यांनी ‘बिंदू’ असे नाव दिले. चपळतेने ‘कॅनव्हास’वर चालणारा कुंचला आणि त्यांची अप्रतिम कलाकृती पाहून नागपुरातील कलारसिक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते. त्यांची ही मौलिक कलाकृती लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी आजदेखील सांभाळून ठेवली आहे.

रझांना असा गवसला ‘बिंदू’
सत्तरच्या दशकात सय्यद रझा यांच्या आयुष्यात असा काळदेखील आला, ज्यावेळी ते स्वत:च्या कामावर असमाधानी होते. रझा आपल्या कलेला एक नवी दिशा देऊ इच्छित होते. यानंतर ते भारतभेटीवर आले व येथे आल्यावर त्यांना आपल्या मुळांची जाणीव झाली. भारतीय संस्कृतीला जवळून जाणण्याची त्यांना संधी मिळाली व यातूनच ही संस्कृती त्यांच्या कलेतून ‘बिंदू’च्या रुपात समोर आली. ‘बिंदू’चा उदय १९८० मध्ये झाला व तो त्यांच्या कलेला आणखी सखोल करत गेला. रझा ज्यावेळी जवाहरलाल दर्डा कला अकादमीतर्फे आयोजित ‘श्लोक’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी नागपुरात आले होते, तेव्हा त्यांनी ‘बिंदू’वर आधारित कलाकृती तयार केली होती व त्यांनी त्याची व्याख्या ‘बिंदू : तळ नसलेल्या शून्यातील अनंत संधी’ अशी केली होती.

सय्यद हैदर रझा नागपुरात
आले असताना त्यांनी साकारलेली विशेष कलाकृती. या कलाकृतीला रझा यांनी ‘बिंदू’
असे नाव दिले. चपळतेने ‘कॅनव्हास’वर चालणारा कुंचला आणि त्यांची अप्रतिम कलाकृती पाहून नागपुरातील कलारसिक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते. त्यांची ही मौलिक कलाकृती लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी आजदेखील सांभाळून ठेवली आहे.

नागपूर, मुंबई व पॅरिस
रझा यांचे वडील सैयद मोहम्मद रझी वरिष्ठ वनाधिकारी होते त्यामुळे त्यांचे बालपण मध्य भारतातील घनदाट जंगलांच्या सिन्निध्यात गेले. दमोहा येथील शासकीय माध्यमिक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करण्याआधीच वयाच्या १२ व्या वर्षी रझा यांची चित्रकलेशी नाळ जुळली. सन १९३९ ते १९४३ ही चार वर्षे नागपूरच्या नागपूर स्कूल आॅफ आर्टमध्ये व त्यानंतर सन १९४३ ते १९४७ अशी त्यापुढील चार वर्षे मुंबईच्या जे. जे. स्कूल आॅफ आर्ट््समध्ये त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले.
फ्रान्स सरकारने दिलेल्या शिष्यवृत्तीवर सन १९५० ते १९५३ या काळात त्यांना पॅरिसमधील इकॉल नॅशिओनेल सुपिरियरेर डेस ब्यॉक्स आर्ट्स या जगप्रसिद्ध कलासंस्थेत आधुनिक चित्रकलेचे धडे गिरविले. त्यानंतर ते फ्रान्समध्येच स्थायिक झाले. १९५६ मध्ये ‘प्रिक्स दा ले क्रिटिक’ हा फ्रेंच कलासमीक्षकांकडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार मिळविणारे ते पहिले फ्रान्सबाहेरचे कलाकार ठरले.
सन १९५९ मध्ये रझा यांनी त्यांची पॅरिसच्या इकॉल कलासंस्थेतील सहाध्यायी जेनिन माँगिलॅट यांच्याशी विवाह केला. या जेनिनही पुढे सिद्धहस्त चित्रकार व शिल्पकार म्हणून प्रसिध्दी पावल्या. जेनिन यांच्या आईने फ्रान्स सोडून न जाण्याची गळ घातली म्हणून रझा तेथेच स्थायिक झाले. जेनिन यांचे ५ एप्रिल २००२ रोजी पॅरिस येथे निधन झाले. १९६२ पासून ते अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात अतिथि प्राध्यापक झाले.

जगभर प्रदर्शने : रझा यांच्या चित्रांचे पहिले सोलो प्रदर्शन सन १९४६ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटी सलोनमध्ये झाले व या पहिल्याच प्रदर्शनात त्यांनी सोसायटीचे रौप्यपदक पटकाविले. गेल्या ७० वर्षांत असंख्य प्रदर्शनांच्या माध्यमातून रझा यांनी जगभरातील चोखंदळ रसिकांना भुरळ घातली. सोलो प्रदर्शनांखेरीज अनेक ग्रुप शो व सलोन्समधूनही रझांची कला सर्वदूर झाली. यात व्हेनिस, साओ पावलो आणि मेन्टन येथील आंतरराष्ट्रीय द्वैवार्षिक प्रदर्शने व नवी दिल्लीतील त्रिनालेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मुंबईच्या ताओ आर्ट गॅलरीत भरलेली ‘रंग रास’ आणि ‘शांती’ ही त्याच्या आलिकडच्या काळातील प्रमुख प्रदर्शनांपैकी. ‘पॉवर आॅफ पीस’व तोक्यो येथील युएनो रॉयल म्युझियममधील ‘इंडिआर्ट शो’मध्येही रझांनी आपल्या कलेचा अमिट ठसा उमटविला. टेट मॉडर्न आर्ट गॅलरी आणि लंडनच्या हाऊस आॅफ लॉर्ड््समध्येही रझा यांची चित्रे सन्मानाने प्रदर्शित केली गेली आहेत.
---------------------------------------------
ते कायम आमच्या हृदयात राहतील
सैयद हैदर रझा यांचे आपल्यातून जाणे हे अतिशय दु:खदायक, धक्कादायक आहे. चित्रकलेच्या क्षेत्रातील ते दैदिप्यमान नक्षत्र होते.जीवनाच्या अखेरपर्यंत ते रंगांशी खैळत राहिले, कलाकृती तयार करीत राहिले. वास्तविक रझा, सूझा, गायतोंडे आणि हुसैन या परंपरेतील ते अखेरचा किरण होते. माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध होते. लोकमत समाचारच्या दीपभव या वार्षिकांकाची ते आतुरतेने वाट पाहायचे.त्यांनी दीपभवसाठी काही चित्रेही काढली होती. त्यांचे नागपूर आणि मराठीवरही प्रेम होते. ते १२ मार्च २0१0 रोजी नागपुरात आले, तेव्हा त्यांनी मला एक चित्र भेट दिले होते. त्या चित्रावर बिंदू, अतल शून्य की अनंत संभावनाएं, असे लिहिले होते. त्यांच्या सन्मानार्थ जवाहरलाल दर्डा फाउंडेशनतर्फे दरवर्षी ५ लाख रुपयांचा रझा पुरस्कार दिला जातो. अशोक वाजपेयी, मनीष पुष्कळे आणि आम्ही सर्वांनी मिळून त्यांचा ९५ वा वाढदिवस साजरा करायचे ठरवले होते. ते इतक्या पटकन जातील, असे वाटले नव्हते. त्यांना दर्डा परिवार, लोकमत समूह आणि जवाहरलाल दर्डा फाउंडेशनतर्फे विनम्र श्रद्धांजली. ते आमच्या हृदयात कायम वास्तव्य करून राहतील.
- विजय दर्डा, चेअरमन,
लोकमत मीडिया एडिटोरियल बोर्ड

कलेच्या दुनियेतील पितामह
रझासाहेब आपल्यात आता नाहीत. हे ऐकूनच स्तब्ध झाले. ते कलेच्या दुनियेतील पितृपुरुष होते. त्यांनी चित्रकलेच्या विभिन्न माध्यमांना हाताळले. नागपूर स्कूल आॅफ आर्ट असो की महाराष्ट्र कला आंदोलन, त्यांचा त्यात मोठा सहभाग असायचा. लोकमत समूहाविषयी त्यांच्या मनात विशेष प्रेम होते. आमच्या श्लोक या संस्थेला आणि संस्थेच्या कला आंदोलनला त्यांचे जे प्रेम, आशीर्वाद मिळाले, त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यशाली मानते. प्रादेशिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रीथिंकिंग द रीजनलद्वारे दुर्लक्ष कलाकृतींचे आयोजन केले, तेव्हा ते अतिशय प्रसन्न झाले होते. त्यांना विनम्र श्रद्धांजली
- शीतल ऋषि दर्डा, डायरेक्टर, श्लोक


आदरणीय व्यक्तिमत्त्वाला देश मुकला
देश एका आदरणीय व्यक्तिमत्त्वाला मुकला आहे. भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे रझा हे एक प्रतीक होते. त्यांची चित्रनिर्मितीच नव्हे तर त्यांचे एकंदर व्यक्तिमत्त्वही जातीधर्माच्या भिंती ओलांडणारे होते. विश्वाच्या पसाऱ्यातील अगम्य आणि अनाकलनियाशी तादात्म्य पावण्यासाठी ते सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांना भेटी देत. - डॉ. सुबोध केरकर,
चित्रकार व म्युझियम आॅफ गोवाचे संचालक

कला क्षेत्रात पोकळी निर्माण झाली
ज्येष्ठ चित्रकार एस.एच रझा यांच्या निसर्गचित्रांची कलाविश्वाला अनेक वर्ष भुरळ पडली होती. एक कलाकार म्हणून निसर्गाकडे पाहता-पाहता सूक्ष्मापर्यंतचा प्रवास त्यांच्या चित्रांतून जाणवत राहायचा. रझा यांनी आयुष्यातील बराचसा काळ पाश्चिमात्य देशात घालविला; मात्र त्यांच्या कलाकृतींमधून कायम भारतीयत्त्व प्रतिबिंबत झाले. जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय कला पोहोचविण्यात रझा यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या जाण्याने कलाविश्वातील मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी, त्यांनी दाखविलेल्या दिशेवर चालणे हे आता नवोदित पिढीच्या हाती आहे. त्यामुळे ही पोकळी भरुन काढण्यासाठी आता कलाक्षेत्रानेच पुढाकार घेतला पाहिजे.
- वासुदेव कामत, अध्यक्ष, बॉम्बे आर्ट सोसायटी

रझा यांच्या कलाकृती चिंरतन मार्गदर्शक
आंतरराष्ट्रीय कॅनव्हासवर ज्येष्ठ चित्रकार एस.एच रझा यांनी स्थान मिळविले. मात्र त्यांचे शिक्षण नागपूर येथील कला महाविद्यालयात आणि त्यानंतर जे.जे.स्कूल आॅफ आर्ट येथे झाले होते. रझा यांना भारतीय परंपरा, तत्त्वज्ञान आणि संगीत यांची आवड होती. त्यांच्या काळात आधुनिक शैलीकडे वळणारे रझा पहिले कलाकार ठरले. त्यांच्या कलाकृतींचा ठेवा हा नवोदितांसाठी कायम ‘आर्टथिअरी’चे काम करेल.
- प्रा.डॉ.मनीषा पाटील, कलाइतिहासकार,
प्राध्यापिका, जे.जे स्कूल आॅफ आर्ट

कलाक्षेत्राची मोठी हानी
ज्येष्ठ चित्रकार एस.एच रझा यांनी प्रोगेसिव्ह आर्ट ग्रूपच्या माध्यमातून भारतीय कलाक्षेत्रात मोठी चळवळ उभारली. त्यांच्या जाण्याने या चळवळीचा अखेरचा दुवा हरपला आहे. रझा यांच्या शैलीत वास्तवाकडून अमूर्ततेकडे जाणारा प्रवास दिसून येतो. त्यांच्या कलाकृतींवर इम्प्रेशनिस्ट शैलीचा प्रभाव होता. त्यांनी निसर्गचित्रण या कलाप्रकाराला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
- डॉ.विश्वनाथ साबळे, अधिष्ठाता, जे.जे.स्कूल आॅफ आर्ट

भारतीय कला सातासमुद्रापार रुजविली
रझा यांनी ९४ वर्ष कलेच्या क्षेत्रात अधिराज्य गाजविले. महाराष्ट्राने चित्रकलेला दिलेल्या अमूल्य हिऱ्यांमध्ये एस.एच.रझा यांचा आर्वजून समावेश केला जातो. रझा यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे बीज फ्रान्समध्ये रुजविले. कला क्षेत्रातील फार तुरळक कलाकार आपल्या संपत्तीचा विनियोग अशाप्रकारे करतात. रझा यांनी फाउंडेशनद्वारे अनेक नवोदित कलाकारांना प्रोत्साहन दिले. - प्रभाकर कोलते, ज्येष्ठ चित्रकार

माणूस म्हणूनही श्रेष्ठच!
रझा यांनी मला कलादालन सुरु करण्यासाठी खूप मार्गदर्शन केले. त्यानंतरच मुंबईत ताओ कलादालन प्रत्यक्षात साकारले. रझा यांच्या केवळ चित्रांद्वारे नव्हे तर विचारांनीही प्रगल्भ होते. त्यांच्या कलाकृतींमधून कायमच भारतीयत्त्व प्रतिबिंबित झाले. कलाकाराप्रमाणेच माणूस म्हणूनही अत्यंत प्रेमळ आणि नम्र होते.
- कल्पना शहा, संस्थापक, ताओ आर्ट गॅलरी

नवोदितांना कायम प्रेरणा दिली.
भारतीय कलाक्षेत्रात आधुनिक कला रझा यांनी रुजविली. एका कलाकाराची जबाबदारी जाणून त्यांनी नवोदित कलाकारांना कायम नवी प्रेरणा दिली. रझा यांचा सहभाग असलेल्या प्रोगेसिव्ह आर्ट ग्रूपच्या माध्यमातून भारतीय कलेला कलाटणी मिळाली. - सुधीर पटवर्धन, ज्येष्ठ चित्रकार

मातीशी नाते जपले
रझा यांनी परदेशात जाऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय तत्वज्ञानाची ओळख आपल्या चित्रातून जगभर पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. त्यांच्या शैलीतील वेगळेपण हे नवोदित पिढीला कायम शिकवणी देईल. - सुभाष अवचट, ज्येष्ठ चित्रकार

रजा साहब का जाना भारतीय समकालीन आधुनिक चित्रकला के क्षितिज से सबसे बड़े नक्षत्र का जाना है. वे प्रोग्रेसिव आर्टिस्ट ग्रुप के अंतिम सदस्य बचे थे. उनके जाने की क्षति की पूर्ति नहीं हो सकती. उन्होंने अपनी कला से भारतीय परंपरा को आधुनिकता के नए रूपक दिए.
- मनीष पुष्कले, प्रख्यात चित्रकार

आमचे ६0 वर्षांचे संबंध आता त्यांच्या जाण्याने संपले आहे. रझासाहेबांनी अनेक तरुणांना प्रोत्साहन दिले. ते चित्रकलेच्या बाबतीतही अतिशय प्रामाणिक होते. त्यांना शॉर्टकट हा प्रकार अजिबात आवडत नसे. रझासाहेब यांची देशातील मोजक्या थोर चित्रकारांमध्ये कायम गणना केली जाईल.
-रामकुमार ,विख्यात चित्रकार

रझा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मी जणू खचूनच गेलोय. आताच दिल्लीहून कोलकात्याला पोहोचलो आणि बातमी समली. रझासाहेब भारतीय पण विश्वविख्यात चित्रकार होते. भारतीय चित्रकलेला त्यांनी वेगळी ओळख दिली. भारतीय चित्रकलेवर त्यांचे अनंत उपकार आहेत. रझासाहेब बराच काळ पॅरिसमध्ये राहत होते. साधारणपणे ६0 च्या दशकात माझी त्यांची तिथे ओळख झाली, पण ती कायम राहिली. भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान यांचे ते अभ्यासक होते आणि तरुणांना ते कायम प्रोत्साहन देत आले. त्यांनी रझा फाउंडेशनची स्थापना केली होती आणि आपली सारी संपत्ती त्या संस्थेसाठी दिली होती. त्या फाउंडेशनद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. अशोक वाजपेयी या फाउंडेशनचे काम पाहतात. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
- जोगुन चौधरी, प्रख्यात चित्रकार आणि खासदार

रझासाहेबांनी भारतीय चित्रकलेचे जगभरात प्रतिनिधीत्व केले. त्यांचे निधन ही खूपच धक्कादायक बातमी आहे.
-सुधाकर शर्मा सचिव, ललित कला अकादमी

रझासाहेबांच्या निधनामुळे मला अतिशय दु:ख झाले. रझासाहेब हे अतिशय थोर चित्रकार होते.
-शोभा डे, प्रख्यात स्तंभलेखिका

Web Title: Covert witch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.