महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाची व्हॉट्स अॅपवर कोविड-१९ हेल्पलाइन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 05:03 PM2020-04-03T17:03:29+5:302020-04-03T17:05:52+5:30
कोविड हेल्पलाइन महाराष्ट्र ही एक स्वयंचलित 'चॅटबोट'सेवा
पुणे: नागरिकांच्या मनात कोरोना विषाणूसंदर्भात अनेक प्रश्न आहेत. सोशल मीडियावर फॉरवर्ड होणा-या चुकीच्या माहितीमुळे अनेकांमध्ये भीतीचेवातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामन्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सोशल मीडियाचेच माध्यम निवडले असून, व्हॉट्स अॅपवर स्टेट कोविड हेल्पलाइन सुरू केली आहे. ही सेवा विनामूल्य असून, सध्या पसरलेल्या कोविड-१९ साथीबद्दल अचूक, विश्वासार्ह व अद्ययावत माहिती मिळवण्याचा केंद्रीय स्रोत म्हणून ही हेल्पलाइन काम करणार आहे.
व्हॉट्स अॅपवरील ही कोविड महाराष्ट्र हेल्पलाइन वापरण्यासाठी केवळ +९१ २० २६१२ ७३९४ हा क्रमांक आपल्या फोन कॉण्टॅक्ट्समध्ये सेव्ह करावा आणि मग असा मेसेज या क्रमांकावर पाठवावा. ही हेल्पलाइन सेवा सुरू होईल. ही सेवा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांत उपलब्ध होणार आहे. कोविड हेल्पलाइन महाराष्ट्र ही एक स्वयंचलित चॅटबोटसेवा असून, याद्वारे नागरिकांच्या कोरोना विषाणूसंदभार्तील प्रश्नांना सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे २४ तासांच्या आत खात्रीशीर उत्तरे दिली जात आहेत. सुरुवातीला ही सेवा कोरोना विषाणू प्रतिबंध व लक्षणे, महाराष्ट्र सरकारतर्फे पुरवले जाणारे सहाय्य आणि सामान्यपणे आढळणारे गैरसमज यांबद्दल माहिती पुरवित आहे. भविष्यकाळात आणखी काही पयार्यांचा यात समावेश केला जाईल. व्हॉट्सअ?ॅपचे भारतातील प्रमुख अभिजित बोस म्हणाले, कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी विश्वासार्ह माहितीचा स्रोत उपलब्ध होणे खूप महत्त्वाचे आहे आणि याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटत आहे. या साथीच्या काळात वापरकर्त्यांनी कोणत्याही माहितीसाठी खात्री करून घेतलेल्या स्रोतांवर अवलंबून राहावे यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो.
--------------------------------------------------------------------------------------------
सध्याच्या आव्हानात्मक काळात आम्ही नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहोत. त्यांनी व्हॉट्स अॅपवरील कोविड हेल्पलाइन महाराष्ट्रवर संदेश पाठवून संदर्भाची पडताळणी करावी आणि शंकांचे निरसन करावे. याबाबत महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शन मिळवावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
---------------------------------------------------------------------------------