लहान मुलांवर 'नोवावॅक्स' लसीची चाचणी जुलै महिन्यापासून सुरू होणार, सीरमची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:40 PM2021-06-17T20:40:14+5:302021-06-17T20:41:04+5:30
पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) जुलै महिन्यापासून लहान मुलांवर नोवावॅक्स कोरोना लसीची वैद्यकीय चाचणीला सुरुवात करणार आहे. तशी योजनाच सीरमनं आखण्यास आता सुरुवात केली आहे.
पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) जुलै महिन्यापासून लहान मुलांवर नोवावॅक्स कोरोना लसीची वैद्यकीय चाचणीला सुरुवात करणार आहे. तशी योजनाच सीरमनं आखण्यास आता सुरुवात केली आहे. लहान मुलांवर वैद्यकीय चाचणीच्या स्टेजमध्ये जाणारी देशाची ही चौथी लस ठरणार आहे. केंद्र सरकारनं मंगळवारी कोरोना विरोधात नोवावॅक्सच्या लसीचे आकडे विश्वासार्ह असून लवकरच वैद्यकीय चाचणी पूर्ण करण्यासाठी तयारी सुरू आहे असं जाहीर केलं होतं.
कोरोना विरोधात नोवावॅक्सची लस अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. तसंच ही लस कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटविरोधात परिणामकारक ठरत असल्याचंही कंपनीचं म्हणणं आहे. नोवावॅक्सची लस ९०.४ टक्के प्रभावी ठरत असल्याचं सुरवातीच्या आकडेवारींवरुन समोर आल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. नोवावॅक्स कंपनीनं लस निर्मितीसाठी सीरम इन्स्टिट्यूटसोबत करार केला आहे.
नोवावॅक्स लस सुरक्षित असल्याचं सध्या सार्वजनिक करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे, असं नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य विभाग) व्ही.के.पॉल यांनीही म्हटलं होतं. "उपलब्ध आकडेवारी पाहता नोवावॅक्सची लस सुरक्षित असल्याचं दिसून येत आहे. पण या लसीचं उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे ही अतिशय जमेची बाब आहे", असं व्ही.के.पॉल म्हणाले होते.