केंद्राकडून राज्याला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत; नवाब मलिक यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:20 PM2021-08-12T12:20:57+5:302021-08-12T12:20:57+5:30
Coronavirus Vaccination : ज्या खासगी रुग्णालयांना लसीच्या साठ्याची मुदत संपेल अशी भिती वाटत असेल त्यांनी ती राज्य सरकारला द्यावी, ती टप्प्याटप्प्यानं परत करण्यात येईल, मलिक यांचं वक्तव्य.
"जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे तेवढा पुरवठा केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला होत नसल्याने लसीकरणाची केंद्र बंद करावी लागत आहेत," अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
"लसीचा दुसरा डोस घेणार्या लोकांची २० लाख संख्या असून पहिला डोस घेणार्या लोकांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या डोसची लस मिळेल परंतु पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळेच लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत," असं मलिक यांनी नमूद केलं.
"ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये लसीचा साठा आहे. तो संपत नाहीये. खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाला त्या लसीची मुदत संपेल ही भीती वाटते आहे म्हणून त्यांनी तो साठा सरकारला तात्काळ द्यावा जेणेकरून निर्माण झालेली लसटंचाई कमी होईल. जेव्हा त्यांना आवश्यक आहे त्यावेळी टप्प्याटप्याने ती लस परत करण्यात येईल," असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही झाल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान केंद्र सरकारने राज्यात निर्माण झालेली लस टंचाई लक्षात घेता तात्काळ लसीचा पुरवठा करावा अशी मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ससंदेतील घटनेवरही भाष्य
संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने जी धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला ही घटना अशोभनीय आहे. संसदेचे कामकाज दोन दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले. याचा अर्थ केंद्रसरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत होते. पेगॅसस प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातनिहाय जनगणना असेल या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता किंवा त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते असेही नवाब मलिक म्हणाले.