Corona Vaccination: कोरोना संकटात राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांनी चिंता वाढवली; तिसरी लाट येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 07:52 AM2021-11-01T07:52:23+5:302021-11-01T07:52:42+5:30
Corona Vaccination: लसीकरणाचा वेग कमी असल्यानं तिसऱ्या लाटेचा धोका
नवी दिल्ली: देशातील कोरोना स्थिती सध्या नियंत्रणात आहे. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा २० हजारांच्या खाली आहे. मात्र तरीही नव्या व्हेरिएंटचा धोका कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असल्यास लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र देशातील ४८ जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग अतिशय आहे. या जिल्ह्यांमधील परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेणार आहेत.
देशातील ४८ जिल्ह्यांमधील लसीकरणाची स्थिती गंभीर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्या लोकांचं प्रमाण ५० टक्क्यांच्या खाली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, या ४८ जिल्ह्यांपैकी २७ जिल्हे ईशान्यकडचे आहेत. यामध्ये मणिपूर आणि नागालँडमधील प्रत्येकी ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. ईशान्याकडील दर ५ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेणाऱ्यांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. या यादीत झारखंडच्या ९, तर महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी बैठक घेण्यापूर्वी लसीकरणाचा वेग कमी असलेल्या राज्यांमध्ये घरोघरी लसीकरण अभियान सुरू करण्यात येऊ शकतं. या अभियानाच्या अंतर्गत लसीकरणाचा वेग कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येईल. मंत्रालयानं गोळा केलेला ४८ जिल्ह्यांची माहिती २७ ऑक्टोबरपासूनचा आहे. त्यादिवशी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दुसऱ्या डोसचा मुद्दा उपस्थित केला होता. देशातील १०.३४ कोटींहून अधिक जणांना निश्चित वेळात दुसरा डोस मिळालेला नाही, असं मंडाविया म्हणाले होते. त्यासोबतच त्यांनी दुसऱ्या डोसचा वेग वाढवण्याची गरज बोलून दाखवली. नोव्हेंबर २०२१ च्या शेवटपर्यंत लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व जणांना लसीचा १ डोस देण्यात यावा, अशी सूचना मंडाविया यांनी बैठकीत केली.
राज्यातील कोणते जिल्हे पिछाडीवर? किती जणांना पहिला डोस?
औरंगाबाद (४६.५%), नंदूरबार (४६.९%), बुलढाणा (४७.६%), हिंगोली (४७.८%), नांदेड (४८.४%) आणि अकोला (४९.३%)