गायीचे दूध दोन रुपयांनी महागले ; येत्या ८ जूनपासून होणार दरवाढ लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 12:00 PM2019-06-05T12:00:49+5:302019-06-05T12:06:41+5:30
गेल्या आठवड्यातच काही खासगी दूध व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ केली आहे.
पुणे : गायीच्या दूध दरामधे प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभेत मंगळवारी घेण्यात आला. ही दरवाढ येत्या ८ तारखेपासून लागू होणार आहे.
दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सभागृहात बैठक झाली. त्यात दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के, संघाच्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, ऊर्जा दूध संघाचे प्रकाश कुतवळ, सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने, शिवामृतचे धैर्यशील मोहिते या वेळी उपस्थित होते. या दूध संघाचे राज्यभरात ११० सदस्य आहेत.
गेल्या आठवड्यातच काही खासगी दूध व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ केली आहे. पाठोपाठ जिल्हा दूध उत्पादक संघ आणि उर्वरीतखासगी व्यावसायिकांनी देखील भाव वाढीचा निर्णय घेतला. म्हशीचे भाव मात्र पुर्वी प्रमाणेच कायम राहणार आहेत. सध्या बाजारात गायीचे दूध ४२ ते ४४ आणि म्हशीचे दूध ५२ चे ५६ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.
-------------
कात्रजच्या दूध दरवाढीचा निर्णय २५ जूनला
दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत दुधाच्या भावात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी तूर्तास कात्रजच्या दूधाचे भाव पूर्वी प्रमाणेच असतील. येत्या २५ जून रोजी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची बैठक बोलावली जाईल. त्यात दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. त्यात दरवाढीचा निर्णय होणार असल्याचे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी सांगितले.
-----------------------
दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे
राज्यातील दुष्काळी स्थिती, पशूखाद्याचे वाढलेले दर, डिझेलमधील दरवाढीमुळे वाहतुक खर्चात झालेली वाढ याचा विचार करुन सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे. त्यामुळे शेतकºयांना ३० रुपये लिटरप्रमाणे भाव देता येईल, असे दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायक पाटील म्हणाले. सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेले दूध अनुदान डिसेंबर पर्यंत मिळाले. मात्र, त्यानंतरचे तब्बल १५ कोटी रुपये जिल्हा दूध उत्पादक संघाचे थकीत आहेत. लवकरात लवकर हे पैसे मिळावेत अशी अपेक्षा जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी व्यक्त केली.