विदेशांतही गोहत्या हे पाप मानतात
By admin | Published: October 25, 2015 01:33 AM2015-10-25T01:33:37+5:302015-10-25T01:33:37+5:30
गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरीमधील मुस्लीम व्यक्तीच्या हत्येनंतर राजकारण ढवळून निघाले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
नागपूर : गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरीमधील मुस्लीम व्यक्तीच्या हत्येनंतर राजकारण ढवळून निघाले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गोहत्याबंदीचे समर्थन केले आहे. अफ्रिकेतील देशांत हलाखीच्या परिस्थितीत गायीचे रक्त प्राशन करण्यात येते, परंतु त्या बदल्यात तिचे पोषण करण्यात येते. गाईला मारणे तेथेही पाप समजले जाते, अशा शब्दांत त्यांनी गोहत्याबंदीवर भाष्य केले.
नागपुरातील आर. एस. धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘आयसीसीएस’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज्) संयुक्त विद्यमाने ‘प्राचीन भारतीय संस्कृतीचे जगातील प्रतिध्वनी’ या विषयावर शनिवारपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून डॉ. भागवत बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा हे उपस्थित होते. भारताला पुरातन संस्कृती लाभली आहे. भारताच्या संस्कृतीत वैश्विक दृष्टी आहे अन् जगाला आज तिची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर देशातील संस्कृतीचा प्रसार होणे अपेक्षित होते. परंतु व्यक्तिवाद व कुटुंबवादावर जास्त भर देण्यात आल्याने संस्कृतीचे पोषण झालेच नाही. अगदी देशातील स्वातंत्र्यसंग्रामात लढणाऱ्या व्यक्तींवर ‘नेहरू मेमोरिअल’च्या माध्यमातून प्रकाश टाकला तरी भगवीकरणाचा आरोप होतो. संस्कृतीची व्याख्या आपल्या देशात करणे कठीणच आहे, असे महेश शर्मा म्हणाले. (प्रतिनिधी)
भागवतांचे ‘गरुडा’स्त्र
देशात प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असलेली नावे देण्यावर विवाद होतो त्याबद्दल डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी भाष्य केले. इंडोनेशियामध्ये आघाडीची विमानकंपनी ‘गरुडा-इंडोनेशिया’ हिला पुराणांमधील गरुडाचे स्थान लक्षात घेऊन नाव देण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात अशी नावे देण्याचा प्रयत्न झाला तर मात्र गोंधळाला सुरुवात होते, असे ते म्हणाले. त्यांचा रोख केंद्रातील विरोधी पक्ष व डाव्या विचारसरणीच्या पक्षांवर होता. डॉ. महेश शर्मा यांनीदेखील सरसंघचालकांचीच री ओढत असे प्रयत्न झाले तर भगवीकरणाचे आरोप होतात असे वक्तव्य केले. परंतु जर नवीन प्रकल्पांना अशी भारतीय संस्कृतीशी जुळलेली नावे देण्याचा प्रस्ताव आला तर त्यांचा सकारात्मकपणे विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.