‘गोकूळ’ गाईचे दूध दोन रुपयांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:13 AM2017-08-01T01:13:39+5:302017-08-01T01:13:43+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकूळ) गाय दूध विक्री दरात आजपासून प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकूळ) गाय दूध विक्री दरात आजपासून प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात टोण्ड दूध आता ४० रुपयाला मिळणार आहे.
राज्य सरकारने २० जूनपूर्वी गाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलीटर तीन रुपये वाढ करण्याचे आदेश दूध संघांना दिले होते. गायीचे ३.५ फॅट साठी २७ तर म्हैस ७.० फॅटसाठी ३५ रुपये खरेदी दर देण्याची सूचना केली होती. दरवाढ न करणाºया संघांवर कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला होता. त्यानुसार ‘गोकूळ’ने २१ जूनपासून गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. ‘गोकूळ’चा म्हैस दूध दर सरकारच्या दरापेक्षा ३.३० पैसे जादाच होता. त्यामुळे म्हैस दूध खरेदी दरात संघाने वाढ केली नाही. संघाचा गाय दुधासाठी ३.५ फॅटला २५ रुपये दर होता, त्यामुळे दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.
खरेदी दरात वाढ केल्याने विक्री दरात वाढ करण्यासाठी गेले महिनाभर संघाच्या पातळीवर हालचाली सुरू होत्या. आजपासून प्रतिलीटर दोन रुपये विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गगनबावडा वगळता उर्वरित जिल्ह्यात टोण्ड दूध ४० रुपये दर झाल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.