‘माकपा’ची आक्रमक भूमिका
By admin | Published: August 3, 2015 01:14 AM2015-08-03T01:14:38+5:302015-08-03T01:14:38+5:30
जमीन अधिग्रहण विधेयक कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेत मंजूर होऊ दिले जाणार नाही. कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा अधिकार हिरावून घेणारे
अलिबाग : जमीन अधिग्रहण विधेयक कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेत मंजूर होऊ दिले जाणार नाही. कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा अधिकार हिरावून घेणारे भाजपा सरकार हे बहिरे झाले आहे. त्यांना जनतेचा आवाज ऐकविण्यासाठी २ सप्टेंबरला सर्वांनी रस्त्यावर उतरून भारत बंद करा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी केले.
जनतेचा अधिकार हिरावून
घेत गरीब आणि धनिकांसाठी अशा दोन भारतांची निर्मिती करणाऱ्या भाजपा सरकारला रोखण्यासाठी
डाव्या विचारांनी एकत्र येणे
गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अखिल भारतीय शेतकरी
कामगार पक्षाचा ६८ वा वर्धापनदिन अलिबाग येथील समुद्र किनारी पार पडला. त्या वेळी खासदार येचुरी बोलत होते.
आपल्या २० मिनिटांच्या भाषणात खासदार येचुरी यांनी मोदी सरकारवर जबरदस्त तोफ डागली. मोदी सरकार भारतामध्ये ज्या नीती लागू करीत आहे त्या शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचा विरोधातील आहेत. त्यांची आर्थिक नीती देशासाठी अतिशय घातक आहेत. निवडून येण्यापूर्वी जनतेला दिलेली आश्वासने मोदी सरकारने पाळलेली नाहीत. राज्यसभेत फक्त एकदाच ते उपस्थित राहिले आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही.
परदेशातील काळा पैसा परत आणण्याची भाषा केली जात आहे, परंतु आधी परदेशात गेलेल्या मोदींना परत आणा अशी कोपरखळी खासदार येचुरी यांनी मोदींच्या सततच्या परदेशवारीविरोधात लगावली. पाच लाख करोड रुपयांची करामध्ये भांडवलदारांना मोदी सरकार सूट देत आहे, तर दुसरीकडे गरिबांची सबसिडी काढून घेत आहे. देशात पैशाची कमी नसून योग्य नीतीची आवश्यकता आहे. यासाठी देशात तिसरी आघाडी करावीच लागणार असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)