१० कोटींचे फुटले फटाके
By Admin | Published: November 1, 2016 05:31 AM2016-11-01T05:31:28+5:302016-11-01T05:31:28+5:30
वाढलेली महागाई व पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा फटका या वर्षी फटाके व्यवसायाला बसला.
नागपूर : मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांना आधीच घसरण लागलेली असताना वाढलेली महागाई व पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा फटका या वर्षी फटाके व्यवसायाला बसला. या वर्षी १० टक्क्यांनी विक्रीत घट झाल्याचे फटाका विक्रेत्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी दिवाळीच्या काळात फटाक्यांची शहरात १० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची गेल्या काही वर्षापासून होत असलेली जनजागृती, फटाक्यांच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची झालेली वाढ यामुळे फटाक्यांची विक्री घटली. लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी फटाक्यांचा धूर निघाला नाही. त्यामुळे काही प्रमाणात मोकळा श्वास घेणे शक्य झाले. फटाका विक्रेत्यांच्या मते, २०११ पासून फटाक्यांच्या विक्रीत घट येणे सुरू आहे. या व्यवसायासाठी ही धोक्याची घंटा आहे. या वर्षी बहुतांश व्यावसायिकांकडील फटाके मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिले आहे. दुसरीकडे आॅक्टोबर महिन्यात दसरा व दिवाळी आल्याने खर्च बराच झाल्याचे म्हणत मध्यमवर्गीयांनी फटाके खरेदीला कात्री लावली. गेल्या वर्षी नागपूरच्या ठोक बाजारात सुमारे १५ कोटींची फटाके विक्री झाली होती. यावर्षी ती १० कोटींवर आली आहे. (प्रतिनिधी)