प्राप्तिकर विभागाने केली शीघ्र कृती दलाची स्थापना : अर्ध्या तासात होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 07:23 PM2019-03-13T19:23:09+5:302019-03-13T20:10:50+5:30
मतदाराला प्रभावित करण्यासाठी पैसे, सोने, चांदी अथवा मौल्यवान वस्तूंचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
पुणे : लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या काळ्या पैशांच्या वापराला आळा बसावा यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रत्येक मतदार संघामध्ये शीघ्र कृती दलाची (क्विक रिस्पॉन्स टीम) स्थापना केली आहे. प्राप्तिकरच्या पुण्यातील कार्यालयातून मुंबई वगळता राज्यातील ४८ पैकी ४२ लोकसभा मतदार संघावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाचे (तपास) महासंचालक दीपक कपूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्राप्तिकर विभागाचे (तपास) अतिरिक्त संचालक तथा तपास यंत्रणेचे राज्याचे समन्वयक अजय मोदी, अतिरिक्त संचालक रवी प्रकाश या वेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकी दरम्यान काळ्या पैशाचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तीकर विभागाने सतर्क रहावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्राप्तिकर विभागाने तपास यंत्रणा आणि गुप्तचर विभागाला दक्षतेचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राप्तिकर विभागाने प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दलाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे अथवा मौल्यवान वस्तूंच्या वापरावर नजर ठेवली जाणार आहे.
याबाबत माहिती देताना प्राप्तिकर विभागाचे (तपास) महासंचालक कपूर म्हणाले, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ वगळता उर्वरीत राज्यातील ४२ मतदार संघामधील काळ्या पैशाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पुणे कार्यालयावर असेल. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सोमवारी (दि. ११) नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. पाठोपाठ प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दल स्थापण्यात आले. त्याच्या नियंत्रणाची जबाबदारी अतिरिक्त संचालक आणि चार सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
मतदाराला प्रभावित करण्यासाठी पैसे, सोने, चांदी अथवा मौल्यवान वस्तूंचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. निवडणूक काळात अशा प्रकारे कोणी वर्तन करताना आढळल्यास, नागरिकांनी प्राप्तीकर विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी चोवीस तास निरीक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तक्रार करण्यासाठी अथवा माहिती देण्यासाठी १८००२३३०७०० अथवा १८००२३३०७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय ७४९८९७७८९८ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राप्तीकर विभागाने केले आहे.
-------------------
काळा पैसा बाळगणाऱ्यांना मिळणार दंड
निवडणुकीच्या दरम्यान काळा पैसा आढळणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून ज्ञातस्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी कारवाई होईल. दंडासह ती रक्कम भरावी लागेल. अनेकदा नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा रक्कमेचा निवडणुकीत वापर केला जातो. त्यामुळे रक्कमेचा स्त्रोत देखील तपासण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त पोलिसह संबंधितांवर वेगळी कारवाई करतील.