सेवाभावी कामातून स्वतःची ओळख निर्माण करा- नारायण राणे
By admin | Published: February 26, 2017 07:44 PM2017-02-26T19:44:35+5:302017-02-26T19:44:35+5:30
लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम असते. आपण त्या लोकांचे प्रतिनिधी असतो. म्हणूनच आपण साहेब बनून न वागता जनतेचे सेवक आहोत, याची जाणीव
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 26 - लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम असते. आपण त्या लोकांचे प्रतिनिधी असतो. म्हणूनच आपण साहेब बनून न वागता जनतेचे सेवक आहोत, याची जाणीव ठेवून समाजामध्ये विनम्रतेने व सेवाभावीवृत्तीने तसेच परिपूर्ण अभ्यास करून जबाबदारीने काम करा. आपल्या चांगल्या कामातून स्वत:ची ओळख निर्माण करा व कॉँग्रेस पक्षाचा सन्मान वाढवा. अशाप्रकारचा कानमंत्र माजी मुख्यमंत्री, कॉँग्रेस नेते नारायण राणे यांनी कॉँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्यांना दिला.
येथील ओम गणेश निवासस्थानी रविवारी नारायण राणे यांनी कॉँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना पुढील कामकाजासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, रणजित देसाई, मधुसुदन बांदिवडेकर, संजू परब, गुरूनाथ पेडणेकर, सुरेश सावंत, प्रमोद कामत, मंदार केणी आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, स्वत:ही नावारूपाला येऊन कर्तृत्ववान बना. आपली वैचारिक व बौद्धिक पातळी जेवढी वाढवाल तेवढी प्रगती साधता येईल. जनसेवेचे कार्य यालाच मी खरा दागिना समजतो. लोकांशी सतत संपर्क ठेवा. लोकशाहीत सत्ताधारी व विरोधक एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तुम्ही विश्वस्त आहात या भावनेने तुम्ही काम करा. नवनिर्वाचित सदस्यांनी आपल्या अंगी अभ्यासू वृत्ती बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक यशस्वी महान व्यक्तिची चरित्रे अभ्यासून आत्मसात करा. या सर्व महान व्यक्तिनी आपल्या आयुष्यात शिस्त पाळली व अभ्यासूपणा बाळगला म्हणूनच ते मोठे झाले. आयुष्यात यशस्वी लोकप्रिय व कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी बनायचे असेल तर लोकसंपर्क कायम ठेवा. स्वत: स्वस्त होऊ नका. मात्र, तुमच्याकडे येणाऱ्या लोकांशी सौजन्याने वागा. त्यांची ओळख कायम ठेवा. नंतर काही कालावधीनंतर ते आपल्याला भेटले तर त्यांना नावाने हाक मारा. ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले आहे. त्याांच्याशी विनम्रपणे वागा.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुधाकरराव नाईक हे आपल्या राजकीय जीवनात पहिल्यांदा सरपंच होते. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद यावर सदस्य व पदाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ते मंत्री आणि मुख्यमंत्री बनले. माझ्या राजकीय जीवनात प्रारंभी मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतर मुख्यमंत्री पदापर्यंत मी पोहोचलो. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य हे पद कमी समजू नका. तुम्हीही मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकता. अशाप्रकारे जिद्द ठेवून जनतेच्या सेवेच्या व आपल्या भागाच्या विकासासाठी कार्यरत रहा,असेही ते म्हणाले.
कॉँग्रेस जिल्हा सरचिटणीस मधुसुदन बांदिवडेकर यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले. तर दत्ता सामंत तसेच सतीश सावंत यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पक्षशिस्त व मतदारसंघातील कामकाजाची यावेळी माहिती दिली. (प्रतिनिधी)
ठेकेदारी करता येणार नाही!
कॉँग्रेस पक्षाला अभिमान वाटेल असे काम करण्याची तुमच्याकडून अपेक्षा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सदस्यांना कामाचा ठेका घेता येणार नाही. ठेकेदारी करता येणार नाही, अशी सक्त ताकीदही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित सदस्याना दिली.
सदस्य संख्या घटल्याचा विचार करा!
जिल्हापरिषद् मध्ये यापूर्वी कॉँग्रेसचे ५० पैकी ४२ सदस्य होते. ही सदस्य संख्या आता २८ वर आली आहे. तर जिल्हयातील पंचायत समित्यांमध्ये १०० पैकी ७६ सदस्य होते. आता ही संख्या ५६ वर आली आहे. राज्यात अन्यत्र कुठेही कॉँग्रेसला सत्ता मिळालेली नाही.हे खरे असले तरी यापूर्वीची सदस्य संख्या का घटली? याचाही गांभीर्याने विचार करा. ज्या सदस्यांनी आपल्या मतदारसंघात लोकसंपर्क ठेवला नाही. आपल्या भागाचे विकासाचे काम केले नाही, असेच सदस्य पराभूत झाले आहेत. याचे भान बाळगा. मतदारसंघात आपण पुढील पाच वर्षांत चांगले काम केलात तर तुम्ही पुन्हा पुन्हा विजयी व्हाल, असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.
भ्रष्टाचाराला थारा देऊ नका !
गैरमार्गाने, भ्रष्टाचाराने मिळणाऱ्या पैशाची आस धरू नका. आडमार्गाने, भ्रष्टाचाराने मिळालेल्या पैशाची समाजात चर्चा होते. व आपलीही बदनामी होते. म्हणूनच मेहनत व परिश्रम करून पैसा मिळवा. समाजकार्य व राजकारण करताना पहिल्यांदा आपल्या कुटुंबाकडे व संसाराकडे लक्ष द्या. समाजकार्य व स्वत:चा संसार याची सांगड घाला व यशस्वी व्हा.असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.