पोलीस दलात निर्माण व्हावी विश्वासार्हता
By admin | Published: January 9, 2016 04:04 AM2016-01-09T04:04:54+5:302016-01-09T04:04:54+5:30
प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने उत्तम नेतृत्व देऊन कनिष्ठांमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी, त्यांना न्यायबुद्धीने वागणार असल्याची खात्री द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
पुणे : प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने उत्तम नेतृत्व देऊन कनिष्ठांमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी, त्यांना न्यायबुद्धीने वागणार असल्याची खात्री द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वर्षभरामधील गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत केले.
सर्वसामान्यांच्या छोट्यातल्या छोट्या तक्रारीची तत्काळ दखल घेण्याचे तसेच आगामी काळात ‘कोअर पोलिसिंग’ वाढवण्याचे आदेशही त्यांनी दिले. कुंभपर्व, गणेशोत्सव, ईद यांसह सर्वच सण व उत्सवांमध्ये पोलिसांनी शांतता अबाधित ठेवण्यात यश मिळविले. प्रभावी कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्वसामान्य माणूस तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात यावा, यासाठी तेथील वातावरण मोकळे हवे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करताना पारदर्शकता ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक, दलितांबाबतच्या गुन्ह्यात संवेदनशील राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एक लाख घरे बांधणार
तीन वर्षांमध्ये पोलिसांसाठी एक लाख घरे बांधण्यात येणार असून, पुणे आणि नवी मुंबईमध्ये १५ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. जमिनीची खरेदी पूर्ण झाली आहे. नवी मुंबईत ९० एकर जमीन घेतली आहे. तेथे पोलीस कर्मचारी आणि सहायक फौजदारांसाठी घरे असतील, अशी माहिती अतिरिक्त सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी दिली.
पोलिसांचा ‘केआरए’
मुख्यमंत्र्यांनी सर्वच विभागांसाठी ‘केआरए’ आखून दिला होता. गृहविभागाला पोलिसांना तीन वर्षांत एक लाख घरे, दोषसिद्धीचे प्रमाण वाढवणे, सीसीटीएनएस व पुण्याचा सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित करणे, मुंबईमधील सीसीटीव्ही प्रकल्पाला गती देणे, कोणालाही कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची सुविधा देणे, महिला आणि बालकांचा शोध घेऊन त्यांची सुटका करणे अशी १३ उद्दिष्ट्ये देण्यात आली होती. दोषसिद्धीचे प्रमाण १६वरून ४८ टक्क्यांवर गेले आहे. मुंबईमधील साऊथ झोनचा सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित झाला आहे, असे बक्षी म्हणाले.