पतसंस्थेला १.५0 कोटी रुपयांचा गंडा!
By admin | Published: June 5, 2014 01:25 AM2014-06-05T01:25:51+5:302014-06-05T01:32:00+5:30
अकोला येथे शाखाधिकारी व रोखपालाने स्वत:च्या पतसंस्थेला १ कोटी ५0 लाख रुपयांनी लावला चुना.
अकोला : अहमदनगर येथील श्री रेणुका मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीच्या अकोला शाखेमध्ये कार्यरत शाखाधिकारी व रोखपालाने खातेदाराला हाताशी धरून स्वत:च्या बँकेला १ कोटी ५0 लाख रुपयांनी चुना लावल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला. श्री रेणुका मल्टी स्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटीच्यावतीने अहमदनगर येथील शिवनगरात राहणारे दत्तात्रय किसन ढोकणे (३७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोसायटीचे माजी शाखाधिकारी सुग्रीत रामनाथ खेडकर (वय २६, रा. चेकतंबा, ता. गेवराई, जि. बीड), माजी रोखपाल परमेश्वर बापूराव गावंडे (वय २५, रा. निमगाव, अहमदनगर) यांनी अकोल्यातील नाजुकनगरात राहणारा बँकेचा खातेदार अशफाक हुसैन इरफान हुसैन (वय २५) याला हाताशी धरले. या तिघांनीही संगनमत करून श्री रेणुका मल्टी स्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटीची १ कोटी ५0 लाख रुपयांची रक्कम हडपली. आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून अँक्सिस बँकेत ठेवलेली सोसायटीची ही रक्कम काढली. बँक प्रशासनाला या कारनाम्याची माहिती मिळाल्यानंतर, माजी शाखाधिकारी सुग्रीत खेडकर व माजी रोखपाल परमेश्वर गावंडे दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून रामदासपेठ पोलिसांनी बुधवारी दुपारी भादंवि कलम ४२0, ४0६, ४६७, ४६८, ४७१, १२0 ब (३४) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. तिघेही आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ढोकणे यांनी याप्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात आधीच तक्रार दिली होती. परंतु रामदासपेठ पोलिसांनी ही तक्रार फारशी गांभीर्याने घेतली नाही, एवढेच काय तक्रारीची साधी नोंदसुद्धा घेतली नाही. त्यामुळे दत्तात्रय ढोकणे यांनी जिल्हा न्यायालयाकडे तक्रार दाखल केली. न्यायालयाने २ जून रोजी रामदासपेठ पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.