‘ते’ ज्या सरणावर उठून बसले, तेथेच अंत्यसंस्कार; हळहळायला लावणारी चंद्रपूरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 09:10 AM2021-06-14T09:10:31+5:302021-06-14T09:11:15+5:30
शहरातील एका घरात एक वृद्ध निपचित पडून होते. ते मृत पावल्याचे समजून कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. स्मशानभूमीत सरणावर देह ठेवला.
- प्रवीण खिरटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा (जि. चंद्रपूर) : घरात निपचित पडून असलेल्या एका वृद्धाला मृत समजून अंत्यसंस्कारासाठी नेले. मात्र, ती व्यक्ती सरणावर उठून बसली. नातेवाईक आनंदले. त्यांना दवाखान्यात नेले. पण, हाय रे दैवा, दवाखान्यात दोन तासांनी त्यांचा खरोखरच मृत्यू झाला आणि त्याच रचलेल्या सरणावर त्यांना भडाग्नी द्यावा लागला.
शहरातील एका घरात एक वृद्ध निपचित पडून होते. ते मृत पावल्याचे समजून कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. स्मशानभूमीत सरणावर देह ठेवला. अग्नी देण्याकरिता कुटुंबातील सदस्य जाणार, तेवढ्यात ती व्यक्ती उठून बसली. मृत व्यक्ती अचानक जिवंत झाल्याचे बघून स्मशानभूमीत सर्वच जण सैरावैरा पळत सुटले. अखेर त्या व्यक्तीनेच त्यांना परत जवळ बोलावले. खात्री झाल्यानंतर आनंदलेल्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
दोन तासांतच मृत्यू, त्याच सरणावर अग्नी
n वृद्धाला दवाखान्यात दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली. परंतु, यावेळी कुटुंबीयांचा विश्वास बसेना.
n ते वैद्यकीय अधिकाऱ्यांना परत-परत तपासून बघा, असा आग्रह करीत होते. अखेर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत झाल्याची खात्री केल्यानंतर त्यांच्यावर त्याच स्मशानभूमीत त्याच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.