Crime: दोन कोटींच्या विम्यासाठी मृतदेह केला जिवंत, मुंबईत दाखल गुन्हा नगर पोलिसांत वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 02:41 PM2023-04-21T14:41:11+5:302023-04-21T14:41:38+5:30
Crime News: दोन कोटी रुपयांचा विमा लाटण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक, पोलिस कॉन्स्टेबल यांनी संगनमताने बेवारस मृतदेहालाच जिवंत व्यक्तीचे नाव दिले.
आढळगाव (जि. अहमदनगर) - दोन कोटी रुपयांचा विमा लाटण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक, पोलिस कॉन्स्टेबल यांनी संगनमताने बेवारस मृतदेहालाच जिवंत व्यक्तीचे नाव दिले. दावा करण्यासाठी बनावट आई-वडील उभे केले. सर्वांनी मिळून दोन कोटी रुपयांचा लाभही घेतला. मात्र, काहींनी ही बातमी अखेर विमा कंपनीपर्यंत पोहोचवली आणि या सर्वांचे बिंग फुटले. २०१५-१६ या दोन वर्षांत घडलेल्या या फसवणूकप्रकरणी विमा कंपनीने मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल केला, तो आता नगरला वर्ग झाला आहे.
या प्रकरणात दोन कोटींचा बोगस विमा मिळविण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे (रा. करमाळा, जि. सोलापूर ) यास नुकतीच मुंबई पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोेपी पोलिस काॅन्स्टेबल कैलास देशमुख याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
एप्रिल २०१५ मध्ये एलआयसीच्या दादर (मुंबई) शाखेकडून दिनेश प्रमोद टाकसाळे या व्यक्तीने दोन कोटींचा विमा घेतला. १४ मार्च २०१७ रोजी दिनेश टाकसाळे याच्या आई-वडिलांनी दिनेशचा अपघाती मृत्यू झाल्याची कागदपत्रे सादर करत विमा रकमेवर दावा केला. सदर दावा एलआयसीकडून मंजूर करण्यात आला. परंतु, शंका आल्याने एलआयसीने या प्रकरणाची चौकशी केली. तब्बल सहा वर्षे चौकशी केल्यानंतर दिनेश टाकसाळे जिवंत असल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर दोन कोटींल्या बोगस विमाप्रकरणी ओमप्रकाश साहू (सहायक प्रशासकीय अधिकारी एलआयसी दादर शाखा ) यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात २१ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिसांनी तपास करून दिनेश प्रमोद टाकसाळे, त्याला मदत करणारे सहकारी अनिल भीमराव लटके, विजय रामदास माळवदे या तिघांना अटक केली.