टीडीपी आमदारासह १३ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: May 1, 2017 04:13 AM2017-05-01T04:13:18+5:302017-05-01T04:13:18+5:30
गोसेखुर्द सिंचन महाघोटाळ्यातील दोन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)े गुन्हा दाखल करीत आंध्र प्रदेशातील टीडीपीचे
नागपूर : गोसेखुर्द सिंचन महाघोटाळ्यातील दोन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)े गुन्हा दाखल करीत आंध्र प्रदेशातील टीडीपीचे आमदार डी. व्ही. रामाराम यांच्यासह १३ अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी षड्यंत्रअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अनुक्रमे १५.४९ कोटी आणि ७.८१ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाशी संबधित आरोपी हादरले आहेत.
एसीबी अनेक दिवसांपासून गोसेखुर्द महाघोटाळ्याची चौकशी करीत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील पेंढरी शाखेत उपसा सिंचन योजनेंतर्गत कालव्याचे बांधकाम आणि मातीकामासाठी (८.५२ ते ४३.८० कि.मी.) २००६ मध्ये विदर्भ सिंचन विकास महामंडळाने (व्हीआयडीसी) निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात श्रीनिवासन कन्स्ट्रक्शन कंपनी आणि आर. बलरामी रेड्डी अॅन्ड कंपनीला कंत्राट मिळाले. या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याने एसीबीने चौकशी सुरू केली.
या चौकशीच्या आधारावर एसीबीने मे. श्रीनिवासा कन्स्ट्रक्शनचे मालक टीडीपीचे आमदार बी. व्ही. रामाराव रा. मंगलम् रोड तिरुपती, मे. आर. बालारामी रेड्डी अॅन्ड कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर रामी रेड्डी, श्रीनिवासुला रेड्डी, बंजारा हिल्स, तेलंगणा, व्हीआयडीसीचे तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रभाकर विठ्ठलराव मोरघडे रा. इसान टॉवर, शिवाजीनगर, तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखापाल श्याम जगदीश आंबुलकर रा. राधाकृष्ण अपार्टमेंट हुडकेश्वर, तत्कालीन अधीक्षक अभियंता दिलीप दीपराव पोहेकर, रा. पडोळे ले-आऊट परसोडी, तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, रा. सहकरनगर औरंगाबाद आणि तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास मारुती लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.एसीबीने रविवारी या प्रकरणात मुंबईसह १५ ठिकाणी छापे टाकले. (प्रतिनिधी)
३६०० कोटीचा निधी
गोसेखुर्द प्रकल्पावरील खर्चाची किंमत जवळपास ३६०० कोटी रुपये आहे. यासाठी जारी केलेल्या ४० निविदांची चौकशी एसीबीच्या नागपूर शाखेतर्फे सुरू आहे. आतापर्यंत ४ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या प्रकरणात एस. ए. कन्स्ट्रक्शनसह सहा आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. दुसऱ्या प्रकरणात शहा कन्स्ट्रकशनसह १३ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.