मुंबई-बेळगाव एसटीचे स्वागत करणाऱ्या १५ जणांवर गुन्हे

By Admin | Published: June 4, 2017 12:26 AM2017-06-04T00:26:19+5:302017-06-04T00:26:19+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या बसचे स्वागत करणाऱ्या मराठी भाषिकांसह बसचालक, वाहक अशा १५ जणांवर गुन्हे दाखल

Crime against 15 people welcoming Mumbai-Belgaum ST | मुंबई-बेळगाव एसटीचे स्वागत करणाऱ्या १५ जणांवर गुन्हे

मुंबई-बेळगाव एसटीचे स्वागत करणाऱ्या १५ जणांवर गुन्हे

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई / बेळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या बसचे स्वागत करणाऱ्या मराठी भाषिकांसह बसचालक, वाहक अशा १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याची कलमे त्यांच्याविरोधात लावण्यात आली.
बेळगाव मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये एसटीचालक प्रमोद गायकवाड, वाहक देविदास मोरटे (दोघेही सातारा एसटी डेपो), महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मदन बामणे, अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, सूरज कणबरकर, गणेश दड्डीकर, मेघन लंगरकांडे यांच्यासह १५ जणांचा समावेश आहे.
एसटीच्या ‘जय महाराष्ट्र’ या नवीन घोषवाक्याचा समावेश असलेली मुंबई-बेळगाव ही पहिली एसटी बस शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान बेळगाव येथे पोहोचली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी या बसचे स्वागत केले होते. यावेळी चालक प्रमोद गायकवाड, वाहक देविदास मोरटे यांचे भगवा फेटा बांधण्यात आला. कर्नाटक शासनाने या घटनेची गंभीर दखल घेत चालक, वाहकांसह १५ कार्यकर्त्यांवर बेळगाव मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

‘जय महाराष्ट्र’ घटनाक्रम
वार : गुरुवार
वेळ : सायंकाळी ५ वाजता
स्थळ : मुंबई सेंट्रल आगार
परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते जय महाराष्ट्र लिखित एसटीच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. ‘जय महाराष्ट्र’ लिखित पहिली एसटी मुंबई-बेळगाव मार्गावर चालवण्याचे आदेश रावते यांनी या वेळी दिले.
वार : शुक्रवार
वेळ : सकाळी ७.३० वाजता
स्थळ : मुंबई सेंट्रल आगार
एसटी महाव्यवस्थापक कॅप्टन रत्नपारखी यांनी ‘जय महाराष्ट्र’ लिखित मुंबई-बेळगाव एसटीला हिरवा झेंडा दाखवून एसटी मार्गस्थ केली.
वार : शुक्रवार
वेळ : रात्री १०.१५ वाजता
स्थळ : बेळगाव एसटी स्थानक
जय महाराष्ट्र लिखित मुंबई-बेळगाव एसटीच्या चालक-वाहकांचा फेटे घालून पेढा भरवत सत्कार केला. एसटीला हार घालून स्थानकांवर ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा देण्यात आल्या.
वार : शुक्रवार
वेळ : रात्री ११.३० च्या सुमारास
स्थळ : बेळगाव पोलीस ठाणे
मुंबई-बेळगाव एसटी चालक-वाहक यांना चौकशीसाठी बेळगाव पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. तेथे चालक-वाहकाचे नाव, बॅच आणि पत्ता घेण्यात आला. कानडी भाषेतील लिखित कागदांवर चालक-वाहकांची स्वाक्षरी घेऊन शनिवारी पहाटे १ च्या सुमारास चालक-वाहकाला सोडण्यात आले.

Web Title: Crime against 15 people welcoming Mumbai-Belgaum ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.